संगमेश्वरमधील बारवी नदीत बुडून दोघांचा मृत्यू

संगमेश्वर:- बारवी नदीच्या प्रवाहात बुडून दोघांचा मृत्यू झाला. नदीत बुडणाऱ्या सहकाऱ्याला वाचवताना दुसऱ्या सहकार्याचा देखील बुडून मृत्यू झाला.

सिद्धेश संदेश सावंत (१८) आणि बाळकृष्ण अशोक केदारे (३६) अशी मृतांची नावे आहेत. रविवारी मित्रांसमवेत हे दोघे बारवी नदीत पोहण्यासाठी गेले होते. सिद्धेश सावंत हा पाण्यात पोहण्यासाठी उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी गेलेला बाळकृष्ण केदारेही बुडाला. स्थानिक नागरिकांनी त्यांना पाण्याबाहेर काढून बदलापूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यु झाला होता.

सिद्धेश संदेश सावंत हा शिवणे सावंतवाडी येथील राहणारा असून त्याच्या आई-वडिलांसमवेत मुंबई येथे कामानिमित्त गेला होता. तो मे महिना सुट्टी आणि इतर दिवशी ते गावाला येतात मात्र या वर्षी ते गावाला आले नव्हते. सिद्धेश हा हुशार मुलगा होता त्याच्या अचानक मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे.