संकष्टी दिनी गणपतीपुळेत भाविकांना ऑनलाईनच दर्शन 

रत्नागिरी:- कोरोनाची परिस्थिती निवळली असली तरीही अजुनही राज्य शासनाने मंदिरे बंद ठेवली आहेत. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळेतील गणपतीचे मंदिर बंदच आहे. शुक्रवारी (ता. 24) संकष्टी असल्यामुळे गणपतीपुळेत येणार्‍या भक्तांना श्रींचे दर्शन घेण्यासाठी प्रवेशद्वारावरच ऑनलाईन व्यवस्था केली होती. त्यावर श्री गणपतीचे दर्शन घेऊन निघून जात होते. काहींनी मंदिराच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वारासमोरुन कळस दर्शनावर समाधन मानले.

कोरोना कालावधीतील निर्बंध सप्टेंबर महिन्यात शिथिल झाल्यानंतर गणपतीपुळेसह विविध किनारी भागात पर्यटकांचा राबता सुरु झाला. शनिवारी, रविवारी सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या अधिक असते. शासनाने तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन मंदिरे दर्शनासाठी खुली केलेली नाहीत. मंदिरे सुरु झाली तर गर्दी वाढेल आणि त्यामधून कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होऊ शकतो. त्यामुळे गणपतीपुळेतील श्री गणेशाचे मंदिरही बंदच आहे. मागील महिन्यातील अंगारकी चतुर्थीला तर मंदिर परिसरातही जाण्याच मनाई केली होती. शुक्रवारी संकष्टी चतुर्थीला अनेक भक्त दर्शनासाठी येऊ इच्छित होते; परंतु मंदिर बंदच असल्याने त्यांची इच्छा अपूर्णच राहीली असती. या दिवशी मोजकेच भक्त येत असल्यामुळे गर्दी होत नाही. तशीही अजुन कोरोनाची परिस्थिती पूर्ण निवळलेली नसल्याने गणपतीपुळेत येणार्‍यांचा टक्का कमीच आहे. भाविकांच्या दर्शनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी गणपतीपुळे देवस्थान समितीने मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मोठा टीव्ही स्क्रीन लावला आहे. त्यामध्ये थेट गाभार्‍यातील मूर्तीचे दर्शन घेणे शक्य होत आहे. गेले काही दिवस ही व्यवस्था भक्तांच्या पथ्थ्यावर पडत आहे. देवस्थान समितीच्या या सुविधेवर भक्तगणांनी समाधान व्यक्त केले आहे. दिवसाला साधारण चारशे ते पाचशे भक्त दर्शनासाठी ये-जा करत आहेत. स्क्रीनवरील दर्शनाला भाविकांचा चांगला प्रतिसाद आहे. स्क्रीनवरुन दर्शन म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखे असून प्रत्यक्षात गणपती मंदिर लवकरच सुरू व्हावे, असे साकडेही अनेक पर्यटकांकडून घातले जात आहे.
संकष्टीमुळे पर्यटकांची संख्या वाढेल असा व्यावसायीकांचा अंदाज होता; मात्र शुक्रवारी दुपारपर्यंतच भक्तांची ये-जा सुरु होती. त्यानंतर किनार्‍यावर अवघे दहा ते पंधरा पर्यटक होते. त्याचा किनार्‍यावरील व्यावसायिकांना म्हणावा तसा फायदा झालेला नाही. पर्यटक किनार्‍यावरही थांबत नव्हते. कळस दर्शनानंतर पुढच्या प्रवासाला निघून जात होते.