रत्नागिरी:- फाल्गुन पौर्णिमेपासून झाडगाव सहाणेवर भरलेल्या श्रीदेव भैरीबुवाच्या लोकदरबाराची फाल्गुन पंचमीला रंगोत्सवाने सांगता झाली. पोलिस कर्मचाऱ्यांची सलामी घेऊन श्रीदेव भैरीबुवाची पालखी रंग खेळण्यासाठी सहाणेवरून बाहेर पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळून रंगोत्सव साजरा करण्यात आला. रात्री प्रथेनुसार भैरीबुवा मंदिरात विराजमान झाले.
फाल्गुन पौर्णिमेला रत्नागिरीतील बारा वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव भैरीची पालखी मंदिरातून ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर पडली. गावचा कोतवाल राखणकर्ता म्हणून ओळख असलेल्या भैरी बुवाच्या दर्शनासाठी त्यासमोर आपल्या अडी-अडचणी नवसाच्या रूपात मांडण्यासाठी भाविकांनी सहाणेवर हजेरी लावली. यावर्षी अगदी मर्यादित स्वरूपात भैरीचा शिमगोत्सव साजरा करण्यात आला. सर्व नियम पाळून भाविकांना दर्शन देण्यात आले.
पंचमीच्या दिवशी भैरी बुवाने आपल्या दरबाराची सांगता केली. शुक्रवारी दुपारी १ वाजता ठरलेल्या वेळेमध्ये येथील गुरवांनी तमाम जनतेच्यावतीने गाऱ्हाणे घातले. त्यानंतर येथे भैरीबुवावर रंग शिंपडण्यात आला. तो रंग तेथे उपस्थित असलेल्या मानकरी, ट्रस्टी आणि भाविकांवरही उडविण्यात आला. भैरी बुवाने रंग खेळण्यासाठी दिलेली ही एक परवानगीचत असते, असे मानले जाते. त्यानंतर भैरी बुवाची पालखी सहाणेवरून उचलण्यात आली. यानंतर शहरात रंगाची उधळण सुरू झाली.