श्री क्षेत्र गणपतीपुळेत माघी गणेशोत्सवाला आरंभ; हजारो भाविकांची हजेरी

रत्नागिरी:- प्रसिध्द पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्री क्षेत्र गणपतीपुळेत माघी गणेशोत्सवाला आरंभ झाला. दिड दिवसांच्या उत्सवासाठी स्थानिक भाविकांसह जिल्हाभरातील हजारो भाविकांनी हजेरी लावली. यात्रेमध्ये विविध वस्तूंचे चाळीसहून अधिक स्टॉल विक्रीसाठी मंदिर परिसरात लावण्यात आले होते. यामधून आर्थिक उलाढालही झाली. दोन वर्षांनी भक्तांची मंदियाळी माघी उत्सावात पहायला मिळाली.

गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या टाळेबंदीमुळे व कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने कडक निर्बंध लागू केल्यामुळे माघी यात्रोत्सव झालेला नव्हता. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना बाधितांची घट झाल्याने शासनाने निर्बंध शिथिल केले. त्यामुळे स्थानिक दुकानदारांसह घाटमाथ्यावरील विविध दुकानदारांनी हजेरी लावत विविध वस्तूंची दुकाने थाटली. त्यामुळे स्थानिक भाविकांना विविध वस्तूंच्या खरेदीचा मोठा आनंद घेता आला.

गणपतीपुळेबरोबरच जवळच्या मालगुंड, भंडारपुळे, नेवरे, निवेंडी ,भगवतीनगर ,वरवडे ,खंडाळा, जाकादेवी या भागातील स्थानिक भाविक मोठ्या संख्येने गणपतीपुळेत हजेरी लावली. भाविकांनी स्वयंभू गणेश मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेऊन या उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी जिल्हाभरातून तसेच घाटमाथ्यावरील देखील भाविक दर्शनासाठी व यात्रा उत्सवासाठी आल्याचे चित्र दिसून आले. हा यात्रा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे- मालगुंड पोलीस दूरक्षेत्राच्या सर्व पोलीस कर्मचार्‍यांनी आपली विशेष कामगिरी बजावली. उत्सवाच्या निमित्ताने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी विशेष कामगिरी करताना सर्व गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वाचे काम केले. गणपतीपुळे मंदिर व संपूर्ण परिसरात आरोग्याच्या दृष्टीने कुठलाही प्रश्न किंवा मोठी समस्या उद्भवू नये, याकरिता मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी कार्यरत होते. सायंकाळी गणपतीपुळे मंदिराच्या प्रदक्षिणामार्गे ढोल-ताशांच्या गजरात स्वयंभू श्री ची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गणपतीपुळे संस्थानचे सर्व प्रमुख पंच मंडळी, पुजारी, कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थ पालखी मिरवणूकीत सहभागी झाले होते. माघी गणेशोत्सवाची सांगता उद्या 5 फेब्रुवारी रोजी ललिताच्या कीर्तनाने गणपतीपुळे मंदिरात होणार आहे.

किनार्‍यावर जीवरक्षकच नाहीत

या यात्रोत्सवाला आलेल्या सर्वच ठिकाणच्या भाविकांनी गणपतीपुळे येथील यात्रा उत्सवाबरोबरच पर्यटनाचा आनंद लुटतात समुद्रस्नानाचा मनमुराद आनंद घेतला. यावेळी समुद्रावर कुठलाही अनुचित प्रकार किंवा मोठी दुर्घटना घडू नये याकरिता जीवरक्षक नसल्यामुळे येथील समुद्र किनार्‍यावरील सर्वच लहान मोठे स्थानिक व्यवसायिक आपले लक्ष ठेवून होते. सुदैवाने गर्दी असतानाही अनुचित प्रकार घडलेला नाही.