८ लाखांची हानी
राजापूर:- तालुक्यातील कशेळी येथे घराला आग लागल्याची घटना शुक्रवारी (ता. १३) रात्री घडली. यामध्ये घर पूर्ण जळून खाक झाल्याने सुमारे आठ लाखांचे नुकसान झाले आहे. घरात चौघेजण होते; मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कशेळी येथील हरिश्चंद्र मारुती फोडकर, तुषार फोडकर यांच्या राहत्या घराला शुक्रवारी मध्यरात्री सुमारे तीन वाजता आग लागली. या घरातील चौघांना उष्णतेचे चटके लागू लागल्याने ते त्वरित घरातून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. शेजारील ग्रामस्थांनीही आग लागल्याचे समजताच फोडकर यांच्या घराकडे धाव घेतली, मात्र आग एवढी मोठी होती की ती आटोक्यात आणता आली नाही.
याबाबतचे वृत्त कळताच शिंदेसेनेचे तालुकाप्रमुख दीपक नागले यांनी धाव घेत पाहणी केली व पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. या वेळी सरपंच हळदणकर, तलाठी काजल सगट, पोलिसपाटील सुतार यांनी पंचनामा केला. यामध्ये सुमारे ८ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज आहे.









