शॉर्टसर्किटने गादी कारखान्यास आग; सिलेंडरचा स्फोटाने आगीचा भडका

रत्नागिरी:- राधाकृष्णनगर परिसरात शॉर्टसर्किटनंतर लागलेल्या आगीचा भडका उडून सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. आगीचे लोळ बाहेर पडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

शहरातील कोकणनगर येथील राधाकृष्णनगर परिसरात एका घरानजीक गाद्या बनवायचा कारखाना आहे. त्या ठिकाणी अचानक शुक्रवारी सकाळी शॉर्टसर्किट झाले आणि काही क्षणात आगीचा भटका उडाला. ही आग भडकत असतानाच घरातील सिलेंडरचादेखील स्फोट झाला. आगीचे लोळ उठताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. या आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानुसार नगर परिषदेचा बंब घटनास्थळी तत्काळ दाखल झाला.

सकाळी ८ ते ८.३० वा.च्या सुमारास लागलेली आग दुपारी १२ वा.पर्यंत धुमसत होती. अखेर फिनोलेक्स व एमआयडीसी येथील अग्निशमन दलालादेखील या ठिकाणी पाचारण करण्यात आले होते. या आगीमध्ये गादी कारखान्यातील साहित्यासह त्यांच्या घरातील साहित्यदेखील जळून खाक झाले आहे तसेच एका टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे.

या आगीबाबबत माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनीदेखील घटनास्थळी धाव घेतली. महावितरणने परिसरातील वीजपुरवठा काही तासांसाठी खंडित केला होता. या आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले असले तरी ही आग शॉर्टसर्किटने लागली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.त्याची नोंद पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.