प्रलंबित मागण्यांसाठी शासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम
रत्नागिरी:- शेतकऱ्यांच्या २०१५ पासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी आज, १९ ऑगस्ट २०२५ रोजी, रत्नागिरी येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. पावसाची संततधार सुरू असतानाही, जिल्ह्यातील विविध गावांमधून अनेक शेतकऱ्यांनी या बैठकीला उपस्थिती लावली.
सकाळ १०.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे सभेला सुरुवात झाली. यावेळी श्री. जाधव, श्री. विनय मुकुंदम आणि श्री. अशोक भाटकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सभेच्या शेवटी, श्री. प्रकाश उर्फ बाळा साळवी यांनी शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. २०१५ पासूनच्या मागण्या, तसेच कोविड-१९ लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान, माकड आणि वराह यांचा उपद्रव अशा अनेक विषयांवर त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.
यानंतर, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले. शासनाने या मागण्यांवर विचार करण्यासाठी १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. या काळात शासनाने लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा शेतकऱ्याला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. मात्र, मुख्यमंत्री ही वेळ येऊ देणार नाहीत, असा विश्वासही श्री. बाळा साळवी यांनी व्यक्त केला.
बैठकीत महावितरण कंपनीच्या स्मार्ट मीटरलाही शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला. पूर्वीच्या मीटरमुळे वीज ग्राहकांना प्रचंड त्रास झाल्याने, महावितरण कंपनीला निवेदन देऊन स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रयत्नांना विरोध करण्यात आला.या सभेला उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहून, त्यांनी शेतकऱ्यांच्या लढ्याला आपला पाठिंबा जाहीर केला.
कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था याचे मार्फत आज झालेली शेतकऱ्यांची त्यांच्या मागण्यासाठी झालेली सभा.




