खेड:- तालुक्यातील वेरळ-खोपीफाटा येथील एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचा भाजल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जयश्री बबन घोरपडे (७०) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीमती घोरपडे या घरात चुलीजवळ विस्तव पेटवून पाठ करून बसल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या अंगावरील साडीने अचानक पेट घेतला. या घटनेत त्यांची पाठ आणि पाय गंभीररीत्या भाजले. प्रसंगावधान राखून शेजाऱ्यांनी धाव घेत आग आटोक्यात आणली. आणि त्यांना तात्काळ उपचारासाठी कलंबनी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारांची गरज होती. त्यामुळे १३ मार्च २०२५ रोजी त्यांना रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, महिनाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर २९ मार्च २०२५ रोजी सकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी खेड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.