शुक्रवारी पहाटे अवकाळी पावसाची हजेरी; हापूसला मोठा फटका बसण्याची भीती

रत्नागिरी:- हवामान विभागाच्या अंदाजानुसार शुक्रवारी (ता. १७) पहाटेच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटाने पहाटेलाच तांडव सुरु होते. त्यानंतर दुपारपर्यंत ढगाळ वातावरण होते. त्यामुळे आंबा बागायतदार धास्तावले असून किडरोगांसह बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणावर होणार आहे. त्यापासून हापूस सुरक्षित ठेवण्यासाठी फवारणीचा खर्च बागायतदारांना करावा लागणार आहे. ढगाळ वातावरणामुळे अ‍ॅथ्रॅक्सनॉजचे डाग फळावर पडण्याची भितीही वर्तविली जात आहे.

हवामान विभागाने जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडेल अशी शक्यता वर्तविली होती. त्याप्रमाणे बुधवारी (ता. १५) रात्री रत्नागिरीत काही ठिकाणी हलका पाऊस शिंतडला. गुरुवारी दिवसभर हवेत गारवा होता. दुपारी उन्हाचा कडाका जाणवत होता; मात्र सायंकाळी ढगाळ वातावरण तयार झाले. रात्रीही उष्मा अधिक जाणवू लागला. पहाटेच्या सुमारास ढगांचा गडगडाट आणि विजांचे तांडव सुरु झाले. पावसाची हलकी सरही पडू लागली. सुमारे अर्धा तास पावसाची रिपरिप सुरु होती. साडेचार वाजण्याच्या सुमारास वातावरण शांत झाले. हवेत गारवाही जाणवू लागला. शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत आकाश ढगाळलेले होते. त्यानंतर हळूहळू उन वाढू लागले; परंतु हलके वारे वाहत असल्यामुळे उन्हाची तिव्रता जाणवत नव्हती. रत्नागिरी तालुक्यात कोतवडे, गणपतीपुळे, पावस, मजगाव, खाडी पट्टा यासह संगमेश्‍वर, लांजा, राजापूरातील काही भागात पावसाने हजेरी लावली.
पावसामुळे तुडतुड्यासह अन्य किडरोग आंब्यास मोहोरावर आढळून येण्याची भिती बागायतदारांना सतावू लागली आहे. दुपारी थोडं उन पडल्यामुळे अ‍ॅथ्रॅक्सनोजचा मोठा परिणाम जाणवेल असे नाही; परंतु काही प्रमाणात फळावर डाग पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. किडरोगांसह बुरशीपासून सुरक्षेसाठी महागडी औषधे फवारणी करण्याचा खर्च बागायतदारांना करावा लागणार आहे. काही बागायतदारांनी तात्काळ फवारणी सुरु केली आहे. गेल्या काही दिवसात पहिल्या टप्प्यातील आंबा बाजारात पाठवण्यास रत्नागिरीतील बागायतदारांनी सुरवात केली आहे.

दरम्यान, हवामान विभाग मुंबई यांच्याकडून हवामान विषयक प्राप्त संदेशानुसार 18 मार्चपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात वादळी वारे व वीजेच्या गडगडाटासह पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. या काळात नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.