शीळ धरणात बुडून दोघा चिमुरड्यांचा मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणाच्या नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या फणसवळे आंबेकर कोंडवाडीतील दोन चिमुरड्यांचा बुडून मृत्यू झाला. सोमवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दोघांना जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु ते मृत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषीत केले. चिमुरड्यांचा मृत्युमुळे दोघांच्या आईवडिलांनी जिल्हा रूग्णालयात हंबरडा फोडला. यावेळी उपस्थितांचेही डोळे पाणावले.

फणसवळे आंबेकर कोंडवाडीतील तनिष्क अक्षय आंबेकर (वय 8, इयत्ता पहिली), स्मित वासुदेव आंबेकर (वय 7, अंगणवाडी) हे दोघे सोमवारी दुपारी वाडीत खेळत होते. दुपारची वेळ असल्याने वाडीत फारशी रहदारी नव्हती. दोघांनीही गावातील दुकानात खाऊ घेतला. त्यानंतर ते दोघेही थेट शीळ नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले. दोघांनीही पाण्यात उड्या मारल्या. परंतु धरणपात्रात चिखल असल्याने ते अडकले.

बारा वाजण्याच्या सुमारास धरणपात्रात उतरलेली मुले गावातील काही व्यक्तींनी पाहिली होती. परंतु ती बराच वेळ झाली तरी पोहताना दिसत नसल्याने काही ग्रामस्थांनी याची माहिती वाडीतील ग्रामस्थांना दिली. त्यानंतर आई-वडिलांसह नातेवाईक, ग्रामस्थ यांनी धरणपात्राकडे धाव घेतली. पोहणाऱ्या मोठ्या व्यक्तींनी मुलांचा शोध सुरू केला. त्यावेळी एक मुलगा सापडला. त्याला रूग्णालयात हलविण्यात आले तर एकाच तासाच्या फरकाने दुसरा मुलगा त्याच ठिकाणी आढळून आला. त्यालाही जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषीत केले.

तनिष्क, स्मित हे दोघेही संपूर्ण गावाला परिचित होते. ते बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर अख्खा फणसवळे गाव जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल झाला होता. यावेळी दोन्ही मुलांच्या आई-वडिलांनी अक्षरशः हंबरडा फोडला हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. तनिष्क हा पहिलीत शिकत होता तर स्मित अंगणवाडीत जात होता. कडक उष्म्यामुळे शाळांना सुट्टी असल्याने दोन्ही मुले घरीच होते.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नितीन डेरे यांच्यासह  हे.कॉ.विनोद भितळे व ग्रामीण पोलिसांच्या टीमने प्रथम घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर जिल्हा शासकीय रूग्णालयात येऊन मृतदेहांची पाहणी केली. या घटनेची नोंद ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.