रत्नागिरी:- राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणार्या शिष्यवृत्ती परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्याने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5 वी मध्ये राज्यात पाचवा क्रमांक तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8 वी मध्ये सहावा क्रमांक पटकावला.
शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवीचा राज्याचा निकाल 23.90 टक्के लागला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल 32.18 टक्के असून राज्यात पाचवा क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यातील 8 हजार 508 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील 8 हजार 164 विद्यार्थी प्रत्यक्ष परिक्षेला बसले. निकालामध्ये 2 हजार 627 विद्यार्थी पात्र ठरले असून 5 हजार 537 अपात्र ठरले. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील आहेत. गतवर्षी पाचवीमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा राज्यात आठवा क्रमांक होता. यंदा चांगली कामगिरी केली असून प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावत असल्याचे दिसत आहे.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीचा राज्याचा निकाल 12.54 टक्के लागला आहे. राज्यात कोल्हापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. तर रत्नागिरी जिल्हा सहाव्या क्रमांकावर आहे. शिष्यवृत्ती परीक्षेला जिल्ह्यातील 4 हजार 193 विद्यार्थी बसले होते. त्यातील 4 हजार 8 विद्यार्थी उपस्थित राहीले तर 185 अनुपस्थित होते. परीक्षा दिलेल्यापैकी 778 पात्र ठरले असून 3 हजार 230 विद्यार्थी अपात्र ठरले आहेत. जिल्ह्याचा निकाल 19.41 टक्के लागला आहे. गतवर्षी राज्यात रत्नागिरी बाराव्या स्थानावर होते. शिष्यवृत्ती परिक्षेत यश मिळविण्यासाठी शाळांमधून विशेष मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात आले होते. यामध्ये माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण विभागाचां सहभाग होता. शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल जाहीर झाला असला तरीही गुणवत्ता यादी 17 नोव्हेंबरला प्रसिध्द करण्यात येणार आहे.