शिष्यवृत्ती परीक्षा आता 31 जुलै रोजी

रत्नागिरी:- गेल्या काही दिवसांपासून वेध लागलेली शिष्यवृती परीक्षा बुधवार दि. 20 जुलै रोजी पार पडणार होती. मात्र, अतिवृष्टीमुळे उद्ध्वलेली पूर सदृश्य स्थिती आणि काही ठिकाणी झालेल्या भुस्खलनामुळे वाहतूक बंद आहे. त्यामुळे आता 20 ऐवजी रविवार दि. 31 जुलै रोजी ही परीक्षा घ्यावी, अशा सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त शैलजा दराडे यांनी केल्या आहेत.

कोरोना कालखंडामुळे यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ‘तारीख पे तारीख’ सुरू होती. त्यानंतर दोन महिन्यापूर्वी परीक्षेची 20 जुलै ही तारीख अंतिम झाली. जिल्हा शिक्षण विभागाने सर्व मुख्याध्यापकांना शिष्यवृत्तीमध्ये टक्का वाढविण्यासाठी आवश्यक असलेली तयारी करण्याबाबत सक्त सूचना केल्या होत्या.

त्यानुसार प्रत्यक्ष शाळेत मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकांनी मुलांकडून चांगली तयारी करून घेतली. विद्यार्थ्यांची अनेकवेळा ऑफ आणि ऑनलाईन सराव परीक्षा घेतलेली आहे. विद्यार्थी परीक्षेसाठी सज्ज होते. मात्र, परीक्षा चार दिवसांवर आल्यानंतर पन्हा एकदा ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय परीक्षा परिषदेने घेतला आहे.

राज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आता ही परीक्षा 31 जुलैला घ्यावी, असे आयुक्तांनी कळविले आहे.

इयत्ता 5 वीच्या वर्गासाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा कोरोनामुळे यावर्षी लांबणीवर पडली. त्यामुळे पाचवीच्या वर्गात परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी आता सहावीत गेल्यानंतर त्यांची परीक्षा पार पडत आहे. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी प्राथमिक शाळा सोडून माध्यमिकला प्रवेश घेतला आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीच्या अभ्यासातही खंड पडल्याचे वास्तव आहे.