रत्नागिरी:- कोरोनाच्या परिस्थितीमध्येही पाचवी आणि आठवी ची शिष्यवृत्ती परिक्षेला जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोनोचे नियम पाळत ठिकठिकाणी व्यवस्थित नियोजन केले गेले. जिल्ह्यातील १३९ परिक्षा केंद्रावर झालेल्या परिक्षेत एकूण ११ हजार ४३२ पैकी १० हजार ५१४ विद्यार्थ्यानी हजेरी लावली.
तारखा दोनवेळा बदलण्यात आल्यामुळे शिष्यवृत्ती परिक्षेवर अनिश्चितेचे ढग पसरलेले होते. मागील वर्षी कोरोनातील परिस्थितीमुळे ही परिक्षा झाली नव्हती. विद्यार्थ्यांनी या परिक्षेसाठी अभ्यासही केला होता. दहावी-बारावीची परिक्षा रद्द केल्यामुळे शिष्यवृत्ती परिक्षा कशी घ्यायची असा पेच राज्य सरकारसमोर होता. त्यामुळे तज्ञांशी चर्चा करून शिष्यवृत्ती परिक्षा कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाल्यानंतर घेण्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार ही परिक्षा १२ ऑगस्टला घेण्याचे निश्चित झाले. जिल्ह्यातील १३९ परिक्षा केंद्रावर कोरोनाचे नियम पाळत परिक्षा घेण्याचे निश्चित झाले. जिल्ह्यात सुमारे साडे अकरा हजार विद्यार्थ्यांपैकी १०,५१४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षेसाठी शाळेत प्रत्यक्ष उपस्थिती लावली होती. या परिक्षेला ९२ टक्के प्रतिसाद लाभला. या परिक्षेत ५ वीसाठी ७ हजार ७९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ९० केंद्रांवर झालेल्या परिक्षेसाठी ७ हजार १९५ विद्यार्थी हजर होते. ६०० विद्यार्थी अनुपस्थिती होते. तसेच आठवीसाठी नोंदणी झालेल्या ३ हजार ६८९ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ३७१ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. ३१८ जणं अनुपस्थित राहीले.