शिष्यवृत्तीच्या परीक्षेत जि. प. विद्यार्थ्यांची कामगिरी उंचावली 

रत्नागिरी:- शिष्यवृत्तीत उत्तम कामगिरी करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने गुणवत्ता कक्षाची निर्मिती केली. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा 210 पेक्षा अधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांच्या यादीत दुप्पट वाढ झाली असून 111 विद्यार्थी चमकले आहेत. जिल्हा परिषदेचे 2,413 विद्यार्थी शिष्यवृत्तीत उत्तीर्ण झाले आहेत.

राज्य गुणवत्ता परिक्षा परिषदेने घेतलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत यंदा जिल्हा परिषदेतील 6,206 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी नोंदले गेले. त्यातील 6,762 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. 2,798 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 200 पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी 200 आहेत. तसेच 210 पेक्षा अधिक गुण म्हणजेच मेरीटला असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 111 आहे. गतवर्षी 56 विद्यार्थी गुणवंत होते. यंदा ती संख्या दुप्पट झाली. प्रत्येक तालुक्यातील कार्यक्षम शिक्षकांना एकत्रित करुन गुणवत्ता वाढीसाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे. भविष्यात गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या दुपटीहून अधिक वाढणार आहे.
गतवर्षीपेक्षा यंदा प्राथमिक शिक्षण विभागाने उत्कृष्ट कामगिरी केली. शिष्यवृत्ती परिक्षेसाठी गुणवत्ता कक्ष सुरु केला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील विदयार्थ्यांची पटसंख्या टिकवून ठेवून आणि त्यात वाढ करण्यासाठी हा वेगळा उपक्रम होता. शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे आणि शिष्यवृत्तीसह स्पर्धा परिक्षांसाठी हा स्वतंत्र कक्ष आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, शिक्षण सभापती सुनील मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्यासह दोन जिल्हा परिषद सदस्याची नेमणुक केली होती. या कक्षामार्फत शिक्षकांना मार्गदर्शन करणे, 100 टक्के विदयार्थी परिक्षेला बसविणे, प्रत्येक आठवड्याला एक सराव पेपर घेणे, गुण वाढविण्यासाठी अधिक मार्गदर्शन करणे, शिष्यवृत्तीविषयी शिक्षकांची दरमहा कार्यशाळा घेणे, ठरविलेले उद्दिष्ट पूर्ण होते की नाही याचे अवलोकन करणे ही कामे कक्षामार्फत केली जातात.