शिवसेनेला अखेर शरद बोरकर यांची खरी किंमत आता कळली: विवेक सुर्वे

रत्नागिरी:-कै. शरददादा बोरकर यांच्यामुळे शिवसेना रत्नागिरीत उभी राहिली. मात्र पक्षातील काही नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना बाजूला केले. राजकारणाला कंटाळून शरद बोरकर यांनी अध्यात्माकडे वळण्याचा निर्णय घेतला. एकेकाळी नकोसे झालेल्या शरद बोरकर यांची आता पुन्हा शिवसेनेला आठवण झाली आहे. मात्र शिवसेनेचा हा दिखावा असून याला कोणीही बळी पडणार नाही. ज्या तालुकाप्रमुखांनी खासदारांसोबत पत्रकार परिषद घेऊन शरद बोरकर यांचा शिवसेनेशी संबंध नसल्याचे सांगितले त्याच तालुकाप्रमुखांना आता शरद बोरकर यांचे नाव घेऊन शिवसेना वाढवण्याची वेळ का आली असा सवाल नांदीवडे उप सरपंच विवेक सुर्वे यांनी उपस्थित केला आहे. 

संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेत दोन गट पडले. याचा परिणाम रत्नागिरीतही दिसून आला. वाटद जिल्हा परिषद गटातील आमदार उदय सामंत समर्थकांची पदे काढून नव्या नियुक्त्या करण्यात आल्या. वाटद गट शाबीत ठेवण्यासाठी तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी या ठिकाणी पदाधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शरद बोरकर यांनी रुजवलेल्या आणि उभी केलेल्या शिवसेनेला पुढे नेऊया असे आवाहन केले. मात्र बंड्या साळवी यांच्या वक्तव्याचा विवेक सुर्वे यांनी समाचार घेतला आहे. 

रत्नागिरी तालुक्यात शिवसेना पक्ष शरददादा बोरकर यांनी रुजवला. बाळासाहेबांचे विचार त्यांनी तळा गळात पोचवले. शिवसेनेचे तालुका प्रमुख असताना त्यांनी माजी आमदार बाळ माने यांना आमदार म्हणून निवडून देण्यात मोठं योगदान दिले. मात्र, मागच्या काही वर्षात स्थानिक राजकारणाला कंटाळून  अध्यात्म आणि शंभर टक्के समाजकारणाकडे वळल्यानंतर सेनेतील काही पुढाऱ्यांनी शरद बोरकर यांचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र याकडेही दादांनी दुर्लक्षच केले.  

वाटद येथे नुकताच शिवसेनेची बैठक झाली. या बैठकीत शरद बोरकर यांच्या नावाचा उल्लेख करून शिवसेना वाढीसाठी काम करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र शिवसेना खासदार आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी शरद बोरकर यांना किती त्रास दिला आहे हे आम्ही आणी दादांच्या कुटूंबियांनी, मित्र परिवाराने अगदी जवळून पाहिलं आहे. त्यामुळे आता मनधरणी करून त्याचा काही उपयोग नाही असा इशारा विवेक सुर्वे यांनी दिला आहे. ज्या तालुकाप्रमुख साळवी यांनी बोरकर यांच्या बद्दल उदगार काढले त्यांनीच खासदारांच्या बाजूला बसून शरद बोरकर यांचा सेनेशी संबंध नसल्याचे जाहीर केले होते. मग आता शरद बोरकर यांची आठवण होण्याचे कारण काय? शरद दादांचे नाव वापरून जुन्या शिवसैनिकला एकत्र करण्याची वेळ सेनेवर आली असून या फसव्या आवाहनाला जनता भुळणार नाही असे विवेक सुर्वे म्हणाले.