रत्नागिरी:- नुकत्याच झालेल्या अधिवेशनामुळे शिवसेना आमदार भास्कर जाधव चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर एक नवी जबाबदारी येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत चिपळूणमध्ये बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, तिन्ही पक्षांना वाटतंय की भास्कर जाधव जर अध्यक्ष झाले, तर चांगल्या प्रकारे काम करू शकतील असं मत तिन्ही पक्षांचं झालेलं आहे. तशा प्रकारची अनऑफिशियल चर्चा देखील झाली. पण मी सांगू इच्छितो की, शिवसेनेने आपल्या कोट्यातील वनमंत्रीपद देऊन अध्यक्ष पद घेऊ नये, या मताशी मी ठाम असल्याचं जाधव यावेळी म्हणाले.
तसेच शिवसेनेकडे वनखाते तसेच राहून, जर सर्व मिळून, सर्वांच्या मतांनी जर विधानसभा अध्यक्षपद देत असतील तर ते शिवसेनेने घ्यावं, अन्यथा शिवसेनेने आपलं मंत्रीपद सोडून अध्यक्षपद घेऊ नये, कारण एकतर शिवसेनेला महत्वाची खाती नाहीत, मंत्रीपदं सुद्धा कमी आहेत. त्यामुळे शिवसेनेने स्वतःचं मंत्रीपद सोडून विधानसभा अध्यक्षपद घेऊ नये असं मत आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं आहे.
भाजपा नेते ना. नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद मिळाले याबद्दल भास्कर जाधव यांनी त्यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच राणेंना मिळालेल्या मंत्रिपदाबाबत भास्कर जाधव म्हणाले की, नारायण राणे यांना यापूर्वी महाराष्ट्र सरकारने सुद्धा उद्योग खातं दिलं होतं. त्यांनी उद्योग मंत्री असताना महाराष्ट्र मध्ये विशेष करून कोकणात किती उद्योग धंदे आणले हे त्यांनी आधी तपासावं, पण त्यांनी काय उद्योगधंदे आणलेले दिसत नाही, पण आणले असतील समजा आणि त्यामध्ये काही उणीवा राहिल्या असतील, तर आपल्या मंत्रिपदाचा उपयोग देशाबरोबर आपल्या कोकणाला अधिकचा होईल असं त्यांनी काम करावं, अशा आपल्या अपेक्षा असल्याचं जाधव यावेळी म्हणाले..