शिवसेनेत इच्छुकांची गर्दी; तिकीट वाटप करताना कसरत

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना सर्वात मोठा उमेदवार निर्यात करणारा पक्ष बनण्याची लक्षणे आहेत. भाजपा आणि राष्ट्रवादीला शिवसेनेकडून निर्यात होणार्‍या उमेदवारांना स्वत:कडे आयात करून घ्यावे लागणार आहे. या दोन्ही पक्षांना रत्नागिरीतील सर्व प्रभागांमध्ये उमेदवार उभे करण्यासाठी ही भूमिका आवर्जुन घ्यावी लागणार आहे. 

रत्नागिरी नगर परिषदेमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष व 20 नगरसेवक आहेत. पूर्ण बहुमतात असलेल्या शिवसेनेला आपल्या प्रभागात कामे व्हावीत यासाठी राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी समर्थन दिले. यातील तीन नगरसेवक शिवसेनेच्या गोटात धरले तर 30 पैकी विद्यमान 23 नगरसेवकांना उमेदवारी द्यावी लागणार. शहरात शिवसेनेची पाळेमुळे सर्वत्र पसरली असल्यामुळे या विद्यमान नगरसेवकांव्यतिरिक्त इतर शिवसैनिक निवडणूकीसाठी इच्छूक आहेत. त्यामुळे उमेदवारी देताना शिवसेना नेत्यांची फारच दमछाक होणार आहे. पर्यायाने ज्याला उमेदवारी मिळणार नाही तो इतर पक्षाचा झेंडा हातात घेण्याची शक्यता आहे.

शिवसेना-भाजप युती असताना कमी नगरसेवक असले तरी भाजपाला नगर परिषदेतील सत्तेचा अर्धा वाटा मिळत होता. त्यामुळे जेथे भाजपाचे वर्चस्व होते त्या प्रभाग किंवा वॉर्ड व्यतिरिक्त इतर ठिकाणी भाजपा संघटन भक्कम व्हावे यासाठी फारसे प्रयत्न केले गेले नाहीत. त्यामुळे भाजपाकडे सर्वच प्रभागांमध्ये स्वत:चे उमेदवार मिळणे जड जाणार आहे. ही परिस्थिती ओळखून गेल्या तीन वर्षात भाजपच्या नवीन पदाधिकार्‍यांनी भाजपाची स्थिती मजबूत व्हावी, यासाठी प्रयत्न केले आहेत.

शिवसेनेचे वर्चस्व पाहता म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला दिसून येत नाही. भाजपाला त्यामुळे स्वत:ची काही मते असणार्‍या उमेदवारांची गरज आहे. ही गरज उमेदवारी न मिळणार्‍या शिवसेनेतील नाराज इच्छूकांकडून भरली जावू
शकते. कॅबिनेटमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर या पक्षाची शहरातील अवस्थाही बिकट झाली आहे.
शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी राष्ट्रवादीचे सर्व प्रभागांमध्ये उमेदवार असावेत यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू केले. परंतु राष्ट्रवादीत दोन गट असल्याने या प्रयत्नांचीही निराशा होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडेही उमेदवारांची उणिव भासणार असल्याने त्यांचीही मदार शिवसेनेतून नाराज होवून येणार्‍या इच्छूक उमेदवारांवरच आहे. त्यामुळे शिवसेना सर्वाधिक इच्छूक उमेदवारांची निर्यात करणारा पक्ष ठरून त्याचा फायदा राष्ट्रवादी आणि भाजप करून घेण्याच्या तयारीत आहे.