उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष घणाघात
रत्नागिरी:- “शिवसेनेचा मावळा रडणारा नाही, लढणारा आहे”, “लोकसभेचा विजय मिळवला तेव्हा निवडणूक यंत्रणेवर आक्षेप घेतला नाही. विधानसभेच्या निवडणुकीत लाडक्या बहिणीने घरचा रस्ता दाखवल्यानंतर आता महापालिका निवडणुका जवळ आल्यावरच निवडणूक आयोग आणि मतदार याद्यांवर संशय घेतला जातोय. दररोज आयोगात जाऊन आरोप केले जात आहेत, कोर्टालाही सल्ले दिले जात आहेत. हा सगळा रडीचा डाव आहे. शिवसेनेचा मावळा कधी रडणारा पाहिलाय का? हा लढणारा आहे, आणि हा एकनाथ शिंदे लढणार आहे,” असे शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता ठाकरे यांच्यावर खोचक प्रहार केला. ते म्हणाले, “इज्जत गेली गावाची तेव्हा आठवण झाली भावाची. शिवसेना हे बाळासाहेब ठाकरे यांचे ऐश्वर्य आहे. त्यांचे विचार ही आपली संपत्ती आहे. मी तुमचा प्रमुख आहे, पण तुम्ही माझी ताकद आहात. कोकणाने बाळासाहेबांवर अपार प्रेम केलं आणि बाळासाहेबांनी देखील कोकणावर भरभरून प्रेम केलं आहे. कोकण हा शिवसेनेचा श्वास आहे आणि बाळासाहेबांचे विचार या मातीमध्ये खोलवर रुजलेले आहेत.” ते पुढे म्हणाले, “1995 पासून जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे आणि पुढील 56 वर्ष तो डौलाने फडकत राहील, असा मला विश्वास आहे.”
“शिवसेनेचा झंझावात सर्वत्र आहे, पण यात कोकणाचा सिंहाचा वाटा आहे. या निवडणुकीत धनुष्यबाण एवढ्या जोरात चालेल की विरोधकांची पळता भुई थोडी होईल. विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल,” असे शिंदे म्हणाले.
त्यांनी आपत्ती काळातील शिवसेनेच्या मदतीची उदाहरणे देत सांगितले, “पहलगाम हल्ल्यावेळी पर्यटक अडकले असताना मी स्वतः त्या ठिकाणी धावलो. आमचे कार्यकर्ते म्हणाले, ‘हम भागने वाले नहीं, भागाने वाले हैं!’ मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत करून आम्ही लोकांची घरे साफ केली. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे,” असे त्यांनी नमूद केले.
“ही ‘देना बँक’, ‘लेना बँक’ नाही”
शिंदे म्हणाले, “मी देणारा माणूस आहे, घेणारा नाही. ही ‘देना बँक’ आहे, ‘लेना बँक’ नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीही सरकारकडून भरभरून मिळेल. माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात पाच कोटी लोकांना योजनांचा लाभ मिळाला. काहींनी टीका केली, पण आम्ही कृतीतून उत्तर दिले.”
“लाडक्या बहिणीने दाखवला घरचा रस्ता”
शिंदे पुढे म्हणाले, “मी सांगायचो, सावत्र भाऊ येतील, त्यांना त्यांची जागा दाखवा. विधानसभेच्या निवडणुकीत लाडक्या बहिणीने विरोधकांना ‘232 नंबरचा जोडा’ दाखवला. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने आमदार निवडून आले.
“खुर्ची नव्हे, कार्यकर्ता आमचा अजेंडा”
“काहींनी एका खुर्चीसाठी सर्व काही गमावले, पण आमचा अजेंडा खुर्ची नाही, आमचा अजेंडा कार्यकर्ता आहे. विरोधक कमजोर आहेत आणि कपटी आहेत. मतदार यादीतील हक्काचा मतदार वंचित राहू नये आणि नको असलेला यादीत राहू नये, यासाठी दिलेल्या ॲपवर काम करा,” असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
“दिवाळीत विरोधक लवंगी बार फोडतील, पण आपला बॉम्ब काफी ”
विनोदी शैलीत शिंदे म्हणाले, “या दिवाळीत विरोधक लवंगी बार फोडतील, पण आपला एकच अॅटम बॉम्ब ‘काफी’ आहे.असा वाजेल की विरोधक नेस्तनाभूत होतील! ते प्रॉपर्टीचे वारसदार आहेत, आपण विचारांचे वारसदार आहोत. कोकणावर भगवा फडकवण्याचा संकल्प करूया,” असे सांगत शिंदे यांनी आपले भाषण *‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ या घोषणेने संपवले.
या मेळाव्याला उद्योगमंत्री उदय सामंत,गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार निलेश राणे, आमदार किरण सामंत, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार राजन साळवी,यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.