रत्नागिरी:- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत आणि युवा सेनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेला रत्नागिरी शहरात मोठा प्रतिसाद लाभला. पाच विविध केंद्रांवर 1 हजार 799 डोस पहिल्या दिवशी देण्यात आले. पुढील दोन दिवस ही मोहीम सुरु राहणार आहे. ना. सामंत यांनी युवकांसाठी राबवलेल्या या मोहिमेमुळे युवा वर्गाकडून त्यांचे आभार व्यक्त केले जात होते.
केंद्र शासनाने 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण जाहीर केल्यानंतरही युवा वर्गाला लस मिळत नव्हती. डोसचे प्रमाण कमी असल्याने ऑनलाईन बुकींग काही क्षणातच फुल होत असे. त्यामुळे युवा वर्गामध्ये नाराजी वाढत होती. ना. सामंत यांच्याकडेही युवा वर्गाने डोसबाबत तक्रारी केल्या होत्या. यापूर्वी ना. सामंत यांनी मोबाईल व्हॅनद्वारे ज्येष्ठांसाठी लसीकरण सुरु केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. अगदी परदेशात जाणार्यांसाठीही लसीकरण मोहीम राबली होती. त्यामुळे युवा वर्गाकडून होणारी मागणी ना. सामंत यांनी गांभिर्याने घेतली. रत्नागिरी युवा सेना व ना. सामंत यांनी शहरातील 18 ते 28 वयोगटातील तरुणांसाठी लसीकरण मोहीम राबवण्याचा निर्णय जाहीर करीत नोंदणी केली होती. शिवसेनेतर्फे सीएसआरमधून ही मोहीम राबण्यात आली. रत्नागिरी शहरातील 18 ते 28 वर्षापर्यतच्या युवकांसाठी लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील भैरव मंगल कार्यालयात प्रभाग क्रमांक 1, 10, 11 व 13मधील युवकांचे लसीकरण करण्यात आले. स्वयंवर मंगल कार्यालयात वॉर्ड क्र. 2, वॉर्ड क्र. 7, स्वामी समर्थ मंगल कार्यालय साळवी स्टॉप येथे वॉर्ड क्र. 3, 4, 5, 6 तर केतन मंगल कार्यालयात वॉर्ड क्र. 8, 9, 14,15 आणि वॉर्ड क्र. 12साठी नगर परिषद शाळा क्र. 10 मिरकरवाडा येथे लसीकरण करण्यात आले. सकाळी 9 वा. या तीनही लसीकरण केंद्रावर लसीकरणाला सुरुवात झाली. युवा सेनेचे पदाधिकारी सर्वच केंद्रांवर युवकांना अर्ज भरण्यापासून, लस देईपर्यत अगदी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठीही मदतीचा हात पुढे करीत होते.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत, खा. विनायक राऊत, आ. राजन साळवी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, नगराध्यक्ष बंड्या साळवी, युवा सेना तालुकाधिकारी तुषार साळवी यांनी सर्वच लसीकरण केंद्रावर भेट देऊन लसीकरण मोहिमेची पाहणी केली. लसीकरण केंद्रावर स्थानिक नगरसेवक, सर्व विभागप्रमुख, उपविभागप्रमुखांसह युवा सेनेचे कार्यकर्ते युवकांना मदतीचा हात पुढे करीत होते. पाच केंद्रांवर 1799 जणांना लस देण्यात आली. हा कार्यक्रम 8 व 9 जुलै रोजीही सुरु राहणार आहे.