शिवसेनेकडून महामार्गावर ‘चक्काजाम’ आंदोलन 

रत्नागिरी:- ‘शिवसेना जिदांबाद’, ‘महामार्गाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराचा निषेध असो’ अशा घोषणा देत संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी हातखंबा येथे महामार्गा रोखून धरला. तब्बल १८ मिनिटे महामार्ग रोखून धरल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांना ग्रामीण पोलीसांनी अटक केली.


मुंबई-गोवा महामर्गावरील वाकेड ते आरवली हे दोन टप्पे प्रामुख्याने रखडले असून, नऊ ते दहा टक्केच कामे झाली आहेत. अनेक ठिकाणी अर्धवट कामांमुळे अक्षरश: नागरिक मेटाकुटीला आले आहेत. महामार्गाच्या कामाबाबत जनतेकडून संताप व्यक्त होत असल्याने केंद्र शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शिवसेनेने हे आंदोलन केले.

वाकेड ते आरवली या मार्गाचे काम तात्काळ सुरु करा, या मागणीसाठी खासदार विनायक राऊत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांनी वारंवार केंद्रीय मंत्री ना.नितिन गडकरी यांची भेट घेवून चर्चा  केली. मात्र प्रत्यक्षात रस्त्याचे काम ठेकेदार कंपनीने सुरुच न केल्याने हतबल झालेल्या शिवसेनेने गुरुवारी चक्काजाम आंदोलन केले.

गुरुवारी सकाळी दहा वाजता शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, शिवसैनिक हातखंबा येथे एकत्र आले होते.संपर्क प्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रमुख बंड्या साळवी, शहर प्रमुख बिपिन बंदरकर, विधानसभा क्षेत्र संघटक प्रमोद शेरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी जिल्हा प्रमुख विलास चाळके यांनी केंद्र सरकारवर टिकेची झोड उठविली. केंद्र सरकार गेले अनेक वर्ष कोकणातून जाणाऱ्या महामार्गाचे काम करत आहे. इतर महामार्ग वेळेत सुरु होवून ती पुर्ण होतात. मात्र कोकणातील या महामार्गाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. याची जाणीव सरकारला करुन देण्यासाठी आज शिवसेनेने आंदोलन केल्याचे श्री.चाळके यांनी सांगितले. मात्र आता शिवसेने शांत बसणार नाही. केंद्र सरकारने तात्काळ काम सुरु न केल्यास यापुढे शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा विलास चाळके यांनी दिला आहे.