ना. सामंत यांच्याकडून पदाधिकाऱ्यांची हजेरी
रत्नागिरी:-शिवसेनेतर्फे राज्यभर शिवसंपर्क अभियान राबवले जात आहे. रत्नागिरी शहरात शिवसंपर्क अभियानाच्या शुभारंभालाच शहरातील अर्धे नगरसेवक, विभागप्रमुख, उपविभागप्रमुखांनी दांडी मारली. सभागृहातील उपस्थिती पाहून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी सर्वांची चांगलीच ‘हजेरी’ घेतली. पदाधिकार्यांनी फक्त खुर्च्याच उबवायच्या असल्यास आता घराघरात मीच जाऊन नागरिकांना भेटतो अशा शब्दात तीव्र नाराजी ना. सामंत यांनी व्यक्त केली.
रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदार संघात हातखंबा-पाली जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाली. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व या मतदार संघाचे आमदार उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात झाली. हरचिरी, पावस, गोळप, नाचणे, मिरजोळे व शिरगाव जि.प. गटात संपर्क अभियानाचा प्रारंभ झाल्यानंतर रत्नागिरी शहरातील स्वयंवर मंगल कार्यालयात कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाप्रमुख विलास चाळके, सहसंपर्क प्रमुख राजू महाडिक, क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, शहरप्रमुख बिपीन बंदरकर व युवा, महिला पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाला शहरातील प्रमुख पदाधिकार्यांची उपस्थिती कमी होती. युवा कार्यकर्त्यांचा जोर मात्र चांगला होता. रत्नागिरीत शिवसेनेच्या असलेल्या नगरसेवकांपैकी अर्धे नगरसेवक गैरहजर होते. विभागप्रमुखही पाच ते सहाच उपस्थित होते. तीस उपशहरप्रमुखांपैकी अवघे सहाजणांनीच हजेरी लावली होती. महिला व युवा पदाधिकारी मिळून सुमारे शंभर एक जणांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती. परंतु शिवसंपर्क अभियानाचे गांभिर्य पदाधिकार्यांना नसल्याचे पाहून ना. सामंत प्रचंड संतप्त झाले होते. जनतेची कामे आपल्याला करायची आहेतच आणि ती होत राहतील. पण पदाधिकार्यांना पक्ष कार्यक्रमाचे गांभिर्य नसेल तर स्पष्ट करावे. शिवसंपर्क अभियान करायचे की नाही तेही सांगावे असे स्पष्ट शब्दात सुनावले. पदाधिकार्यांना उपस्थित रहायचे नसेल तर मी स्वत: घराघरात जाऊन शिवसंपर्क अभियान राबवतो असे सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली. ना. सामंत यांचा संतप्त अवतार पाहून उपस्थित पदाधिकार्यांना मात्र चांगलाच घाम फुटला होता. गैरहजर राहणार्या पदाधिकार्यांची येत्या दोन दिवसात हजेरी घेतली जाणार असल्याची चर्चा कार्यक्रमानंतर पदाधिकार्यांमध्ये सुरु होती.