शिळ धरणावरील जॅकवेल कोसळली; ऐन गणेशोत्सवात शहरावर मोठे पाणी संकट

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी कडून पाणी घेणार

रत्नागिरी:- ऐन गणेशोत्सवात शहरवासीयांवर भीषण पाणी टंचाइचे संकट ओढ़ावले आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणाच्या जॅकवेल जवळ भूस्खलन झाल्याने जॅकवेल पूर्ण स्ट्रक्चरसह नदीपात्रात कलंडले आहे. त्यामुळे पुढील २ दिवस शहराचा पाणी पुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे.दरम्यान पानवल व एमआयडीसीकडून पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिले आहे.

ऐन गणेशोत्सवात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणाच्या जॅकवेल नजीक भूस्खलन झाल्याने शिळ सोनारवाडी येथील जॅकवेल स्ट्रक्चरसह कोसळून अधांतरी राहिले आहे. हि घटना बुधवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली.

बुधवारी रात्री या जॅकवेल येथे दोन कर्मचारी काम करीत होते.पाणी पंपिंगची प्रक्रिया सुरु होती. रात्री १ वाजण्याच्या सुमारास मोठा आवाज झाला. आणि जॅकवेल अचानक नदीपात्रात कलंडू लागली. यामुळे जॅकवेलमध्ये असलेल्या एका कर्मचार्याने बाहेर उडी मारली.

जॅकवेल मागच्या बाजूला नदीपात्रात कलंडत असतानाच विद्युत खांबावरून मोठा आवाज झाला क्षणात अर्धेगाव अंधारात गेले होते. जॅकवेलच्या मागील बाजूस विद्युत वाहिन्या होत्या.त्या वाहिन्यांवर जॅकवेल अधांतरीत अडकले आहे.रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस पडत होता त्यामुळे या दुर्घटनेचा आवाज नजीकच्या वस्तीपर्यंत गेला नाही.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणातील जॅकवेल कोसळली त्यावेळी दोन कर्मचारी त्याठिकाणी काम करीत होते. ही जॅकवेल कोसळताना एका कामगारांने बाहेर उडी मारली तर दुसरा कामगार जॅकवेलमध्ये अडकून पडला. जो ऑपरेटरचे काम करीत होता तोच कर्मचारी अडकून पडला होता.

एकीकडे धो-धो पाऊस आणि दुसरीकडे लाईट गेली असल्याने जॅकवेल परिसरात सन्नाटा पसरला होता. आतमध्ये अडकलेला कर्मचारी सुटकेसाठी जीवाचा आकांत करीत होता.मात्र त्याचा आवाज कोणापर्यंत पोहचत नव्हता.अखेरीस बाहेर उडी मारलेल्या कर्मचार्याने आपला जीव धोक्यात घालून पुन्हा जॅकवेलमध्ये कसाबसा प्रवेश केला आणि आत मध्ये अडकलेल्या ऑपरेटरला सुखरूप बाहेर काढले.

जॅकवेलमध्ये काम करणारे ते दोघे कर्मचारी या घटनेत जखमी झाले होते. अचानक भूस्खलन होऊन जॅकवेल कोसळल्याने त्या दोघानाही मोठ्याप्रमाणात दुखापत झाली होती. जॅकवेलमधून पुन्हा उड्यामारून त्या दोघांनी आपला जीव वाचवला.याची माहिती आपल्या वरिष्ठांना दिली.आणि नजीकच्या ग्रामस्थांची मदत घेऊन त्या दोघांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रत्नागिरी शहराला शिळ धरणातून मोठ्याप्रमाणात पाणीपुरवठा केला जातो. मात्र बुधवारी रात्री घडलेल्या दुर्घटनेमुळे शिळ धरणातून होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. तब्बल २० ते २५ दिवस जॅकवेल नव्या इमारतीत शिफ्ट करण्यासाठी कालावधी लागणार आहे.

शिळ जॅकवेल स्ट्रक्चरसह कोसळल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर त्याचा गंभीर परिणाम होणार आहे. यासाठी नगर परिषदेने पानवलसह एमआयडीसीकडून मोठ्याप्रमाणात पाणी उचलण्याचा निर्णय घेतला असून शहरवासीयांची कोणतीही गैरसोय होणार नाही अशी माहिती मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिली आहे.

बुधवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास  जॅकवेल कोसळल्याने नगर परिषद अधिकारी आणी कर्मचाऱ्यांनी शिळ धरणाकडे धाव घेतली. सध्या नवी जॅकवेल बांधून पूर्ण झाली आहे. ही नवी जॅकवेल जरी जलद गतीने सुरु करायची म्हटली तरी २० ते २५ दिवसांचा अवधी लागू शकतो. यातून काही मार्ग निघतो का? यावर विचार चालू आहे. सर्व नागरिकांना ज्या माध्यमातून पाणी मिळेल त्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहननगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी केले आहे.