शिळ धरणाच्या सांडव्यालगत भुस्खलन; डोंगर खचण्याची भीती

रत्नागिरी:- मुसळधार पावसामुळे भुगर्भातील प्रवाहांमुळे रत्नागिरी तालुक्यात भुस्खलनाचे प्रकार पुढे येत आहे. तालुक्यातील शिळ धरणाच्या सांडव्या जवळ सलग तिन भुस्खलन होत असून तेथील डोंगरचा काही भाग खचण्याची भिती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत सुमारे 40 गुंठे जमीन खचली असून आंबा, काजूची चाळीस झाडे उन्मळून गेली आहे.

धुवाधार पावसाने रत्नागिरी तालुक्याला झोडपले असून पडझडीचे प्रकार सातत्याने सुरु आहेत. दोन दिवसांपुर्वी शिळ धरणाच्या सांडव्याजवळील काही भागात भुस्खलन झाडले. सलग दुसर्‍या येथील आणखीन दहा गुंठे जमिन पुन्हा खचली आहे. पावसाचा जोर वाढत असल्यामुळे हा भाग धोकादायक ठरण्याची भिती निर्माण झाली आहे. तहसिलदार शशिकांत जाधव, सरपंच संदीप उर्फ बावा नाचणकर यांच्यासह पोलिस पाटील सोनिया कदम आणि ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. 20) घटनास्थळाची पाहणी केली. सांडव्यापासून दीडशे मीटर अंतरावरील बाजू खचला आहे. तेथील डोंगर खाली येत असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. सुरवातीला आंब्याची चार झाडे उन्मळून गेली होती. आतापर्यंत 30 ते 40 गुंठे भाग खचला आहे. आंबा, काजूची चाळीस कलमांचे नुकसान झाले असून हा भाग असाचा कोसळत राहीला तर डोंगरावरील बागेचे नुकसान होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

पावसामुळे भुगर्भातील प्रवाह वेगाने धरणाच्या दिशेने प्रवाहीत होत आहेत. धरणातील कालव्याचे पाणी जमीनीत झिरपत असल्यामुळे डोंगरातील भागाचे भुस्खलन होत असून भविष्यात त्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. सांडव्यापासून पंचवीस मीटर अंतरावर एक घर आहे. ते रिकामे असून पुढे पंन्नास मीटर अंतरावर देसाईवाडी आहे. त्या वाडीत सुमारे सातशेहून अधिक लोक राहतात. डोंगर खचण्याचा प्रकार कायम राहिल्यास जवळच असलेल्या तिन घरांना धोका पोचू शकतो.

काही वर्षांपूर्वी खचलेल्या शिळ धरणाच्या सांडव्याच्या बाजूचा भागात संरक्षक भिंत उभारण्याचा 6 कोटी 94 लाखाचा प्रस्ताव रत्नागिरीतील पाटबंधारे विभागाकडून मुंबईतील कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. तर दोन दिवसांपुर्वी खचलेल्या 200 मीटर भागात आणखी नवीन संरक्षक भिंत उभारण्याचा प्रस्तावही नव्याने पाठविण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. या ठिकाणी 214 मीटरची नवीन संरक्षक भिंत उभारण्याचा प्रस्ताव रत्नागिरी पाटबंधारे विभागाकडून तयार केला आहे. ती भिंत मजबूत रहावी यासाठी सिमेंट कॉक्रीटची बांधण्यात येणार आहे.