शिरगाव मधील रस्त्याची रुंदी वाढवणार; आवश्यकता भासल्यास सक्तीने भूसंपादन

रत्नागिरी:- शिरगाव येथील रस्त्याची रुंदी वाढली असली तरी दोन बसेस या ठिकाणाहून पास होत नसल्याने आणखी जागा आवश्यक होती. वेळ पडल्यास निधीची तरतूद करुन सक्‍तीने भूसंपादन करावे लागेल अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी लोकशाही दिनात दिली.
 

लोकशाही दिनात 21 तक्रारी दाखल झाल्या होत्या. यातल 4 तक्रारी निकाली काढण्यात आल्या तर 17 जणांची चौकशी सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. यात महसुलच्या 4, नगरपालिका 2, जिल्हा परिषद 6, पोलीस 2, एसटी 2, पाणी पुरवठा 3, भूमिअभिलेख 1 तक्रार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिरगाव येथील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न अद्याप सुटलेला नाही. छोटी वाहने पास होत असली तरी दोन बसेस आल्यावर वाहतूक कोंडी होत आहे. गर्दीच्यावेळी हा प्रश्‍न जाणवत आहे. स्वत: या वाहतूक कोंडीचा अनुभव आपण घेतला आहे. त्यामुळे रस्ता रुंदिकरण झाले असले तरी आणखी दोन फुटाने रस्ता रुंद होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्‍त केले.

लोकशाही दिनाच्या पत्रकार परिषद बोलताना जिल्हाधिकारी मिश्रा म्हणाले की अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाई पोटी 7 कोटी रुपये आले आहेत. पाणी टंचाई आराखडा तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड उपस्थित होते.