रत्नागिरी:- रत्नागिरी शहर आणि आसपासच्या परिसरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे सध्या येथील राजकारणात महायुतीचे सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. रत्नागिरीपासून अगदी जवळ असलेल्या शिरगाव येथील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन छेडले. यावेळी त्यांनी थेट ठाकरे गटाचे नेते सुरेंद्र उर्फ बाळ माने यांच्याशी संबंधित कंपनी या रस्त्याच्या कामाची ठेकेदार असल्याचा गंभीर आरोप केला.
शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिरगाव येथे उपतालुकाप्रमुख भैय्या शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांविरोधात सोमवारी संताप व्यक्त केला. रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.
मात्र, या आंदोलनाची धार अधिक तीव्र ठेकेदारीवरून झालेली पहावयास मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जाहीरपणे केलेल्या या आरोपात, तेथील शिरगांव रेशनदुकान ते तिवंडेवाडी या रस्त्याच्या दुरावस्थेला बाळ माने यांच्याशी संबंधित कंपनी ठेकेदार म्हणून जबाबदार असल्याचे उपतालुकाप्रमुख भैय्या शिंदे यांनी जाहीरपणे बोलताना म्हटले. रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेले असताना ग्रामस्थ, विद्यार्थी, वाहनधारक यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. संबंधित ठेकेदार या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. रत्नागिरीत अनेक विकासकामांची पूर्तता करणाऱ्या पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका करायची आणि स्वतः मात्र हाती घेतलेल्या, अर्धवट टाकलेल्या कामाला जबाबदार कोण? असा प्रश्न उपतालुकाप्रमुख भैय्या शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. हा आरोप करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. रस्त्याच्या कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्यामुळे पावसाळ्यात लगेचच खड्डे पडले, असा दावा त्यांनी केला. एका बाजूला ठाकरे गट सरकारला खड्ड्यांवरून लक्ष्य करत आहे, तर दुसरीकडे त्यांच्याच कंपनीने केलेल्या कामामुळे हे खड्डे पडले आहेत. या दुरावस्थेला ठाकरे गटच जबाबदार आहे, अशा आशयाच्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.