रज्जाक काझी ; महाविकास आघाडीचे गावपॅनेल रिंगणात
रत्नागिरी:- शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडी गावपॅनेल अंतर्गत निवडणूक लढणार आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये गावच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. अनेक विकासकामे केली आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक पैसाही या ग्रामपंचायतीच्या विकासासाठी दिला नाही. मतदार आम्ही केलेल्या विकासाची नक्कीच परतफेड करतील आणि महाविकास आघाडीची सत्ता येईल, असा ठाम विश्वास या पॅनेलचे निमंत्रक रज्जाक काझी यांनी व्यक्त केला.
उद्यमनगर येथे रज्जाक काझी यांच्या निवास्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी शिवसेना उपनेते राजन साळवी, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, राष्ट्रवादीचे नेते सुदेश मयेकर, कुमार शेट्ये, मिलिंद कीर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, शेखासन, सरपंचपदाच्या उमेदवार फरीदा काझी आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच असल्यापासून गावच्या विकासासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. गावाला एमआयडीसीच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत होते. आतापर्यंत एमआयडीसीचे पाणीबिल सुमारे ६ कोटी रुपये थकित आहे; मात्र ते फेडण्याच्यादृष्टीने आजपर्यंत कोणीच प्रयत्न केला नाही. गाव पाण्याबाबत स्वयंपूर्ण व्हावे यासाठी कित्येक वर्षांपासून आमचे प्रयत्न सुरू होते. त्याला यश आले, आता गाव हक्काचे पाणी पित आहे; परंतु भविष्यात शुद्ध पाणी मिळावे यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा आमचा मानस आहे.
रस्त्यांची परिस्थितीदेखील सुधारावी यासाठी प्रयत्न सुरू आहे. गेल्या निवडणुकीत काही चुका झाल्या. जवळचे होते त्यांनी धोका दिला. त्यामुळे पराभव पत्करावा लागला; मात्र या वेळी या चुका सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे. गाफिल न राहता सतर्क राहून निवडणूक लढणार आहे. आता महाविकास आघाडी म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पाठिंबा असल्याने या वेळी महाविकास आघाडी बाजी मारणार यात शंकाच नाही. एकूण १७ जणांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यापैकी सेनेला ७, राष्ट्रवादीला ६ तर काँग्रेसला ४ जागा सोडण्यात आल्या आहेत. कपबशी निशाणी घेऊन ही निवडणूक लढणार आहे. या वेळी ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनेलचीच सत्ता येणार, असा विश्वास व्यक्त केला.