दापोली:- शिमगोत्सवासाठी मुंबईहून दापोली तालुक्यातील दाभोळ भिवबंदर येथील आपल्या गावाकडे वीस प्रवाश्यांसह निघालेल्या चाकरमानी भाविकांच्या टेम्पो ट्रँव्हल्स मिनी बसला चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने मंडणगड तालक्यातील चिंचाळी घाटात बस साईडपट्टीला जावून मोठा अपघात झाला. आज 28 मार्च रोजी सकाळच्या सुमारास चिंचाळी येथे गाडीला झालेल्या या अपघातात 4 प्रवासी जखमी झाले व गाडीतून प्रवास करणारे अन्य 16 जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातात टेम्पो ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अपघातात सुदैवाने मोठा अनर्थ टळला व कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही.
दरम्यान अपघातग्रस्त जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालय मंडणगड येथे उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर रुग्णांना दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले. या रुग्णांमध्ये दिलीप भुवड, रमेश भुवड, प्रवीण परब, रश्मी भुवड सर्व (रा. दाभोळ भिवबंदर) यांना हात फँक्चर, खांद्याला, तोंडाला दुखापत झाली आहे. गाडीतून प्रवास करणारे अन्य 16 प्रवाशी या अपघतात किरकोळ जखमी झाले.
युवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे तत्काळ मदतकार्य – म्हाप्रळ – चिंचाळी येथे अपघात झाल्याचे कळताच मंडणगड युवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यासाठी या कार्यकर्त्यांनी धावपळ केली व यानंतर वाहनाची व्यवस्था करून दापोली येथील रुग्णालयात पाठवण्यास सहकार्य केले. यामध्ये युवसेना राज्य कार्यकारणी सदस्य चेतन सातोपे, प्रतिक पोतनीस, विकास पवार, पंकज घाग, अनिल रटाटे आदि पदाधिकारी यांनी मदतकार्य केले. यावेळी आरपीआयचे जिल्हा सरचिटणीस, नगरसेवक आदेश मर्चंडे यांनीही मदतकार्यात पुढाकार घेतला.