खेड:- मुंबई गोवा महामार्गावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयासमोर मुंबईहून गुहागरला शिमगोत्सवासाठी येत असताना वॅगनआर गाडीचे टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात चालकासह ४ जण जखमी झाले. गुरुवारी (२१) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
मुंबई येथील एक कुटुंब शिमगोत्सवासाठी कारने (एमएच ४७ एबी ९५०३) गुहागरकडे जात होते. चालकाच्या डोळ्यावर झोपेची झापड आल्याने गाडी रस्त्याच्या दुभाजकावर धडकली. हे लक्षात येताच चालकाने ती पुन्हा रस्त्यावर उतरवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी गाडीचे टायर फुटले आणि गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला उलटली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
अपघात झाल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिक, तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नागरिकांनी लगेचच धाव घेऊन जखमींना अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढले. त्याचवेळी खेडकडे येण्यासाठी निघालेले रुग्णवाहिका चालक आनंद घोले यांनी गंभीर जखमी चालकाला रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवण्यात आले आहे.