शिक्षण संचालनालयाकडून अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याचे आदेश

रत्नागिरी:- राज्यातील विविध विभागात अनधिकृत शाळा सुरू राहिल्याच्या तक्रारी शिक्षण संचालनालयाकडे येत आहेत. या तक्रारींची दखल घेत शिक्षण संचालनालयाने विभागात अनधिकृत शाळा सुरू राहून पालकांची फसवणूक झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी यापुढे तेथील विभागीय उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांची असणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

राज्यात मागील काही दिवस बोगस प्रमाणपत्र घेऊन अनधिकृतपणे शाळा चालवण्यात येत असल्याचे उघडकीस आले होते. त्याशिवाय, राज्यातील अनेक ठिकाणी अनधिकृत शाळांच्या मार्फत विद्यार्थ्यांची फसवणूक केली जाते. या सगळ्या प्रकरणांची दखल घेत राज्यातील अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या संदर्भात शिक्षण संचालनालयाकडून पत्रक जारी करण्यात आले आहे.
राज्यात 560 प्राथमिक, 114 माध्यमिक अशा एकूण 674 शाळा अनधिकृतरित्या सुरू आहेत. चालू शैक्षणिक वर्ष संपण्याआधी यावर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिले आहेत. तसेच या अनधिकृत शाळेवरून कोणतेही न्यायालयीन, लोक आयुक्त प्रकरण उद्भवल्यास तसेच विधानसभा, विधानपरिषेदेत याबाबत प्रश्न उद्भवल्यास त्याची ही जबाबदारी विभागीय उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांची राहील असे त्यांनी स्पष्ट केले आहे. अनधिकृत शाळांविरुध्द नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात टाळाटाळ केल्याचे दिसून आल्यास अधिकार्‍यांवर ही कारवाईच्या स्पष्ट सूचना पाटील यांनी दिल्या आहेत.