शिक्षण विभागाच्या ‘लेटस चेंज’ उपक्रमाचा जिल्ह्यात शुभारंभ

रत्नागिरी:- शालेय शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात राज्यस्तरावर जिल्ह्यातील 4 शाळांची राज्यस्तरावर निवड झाली आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानाला जोड म्हणून राज्याच्या शिक्षण विभागाने ‘लेटस चेंज’ असा उपक्रम या वर्षी सुरू केला.

या उपक्रमांमध्ये शालेय विद्यार्थ्यांकडे मॉनिटरगिरी करण्याचे काम देण्यात आले आहे. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी एखादी व्यक्ती कचरा फेकत असल्याचे निदर्शनास आले तर विद्यार्थ्यांनी लगेच त्याला हटकायचे, कचरा न टाकण्याची सूचना द्यायची. टाकलेला कचरा उचलण्याची विनंती करायची. जेणेकरून समाजातील प्रत्येक व्यक्तीमध्ये कचरा न टाकण्याचा बदल घडला पाहिजे असे काम केलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊन आपल्या शिक्षकांना अनुभव कथन करायचे असा हा उपक्रम असून या प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते झाला.

राज्यात स्वच्छता मॉनिटर उपक्रम प्रभावीपणे राबवलेल्या जिल्ह्याचा आणि शाळांचा निकाल राज्य शिक्षण विभागाने जाहीर केला. प्रकल्पात 64 हजार 198 शाळांनी सहभाग घेतला होता. जिल्ह्यातील 2 हजार 130 शाळेत हा उपक्रम राबवला गेला होता. विद्यार्थी वाटेल तिथे कचरा टाकणार्यांना व बेफिकीर थुंकणार्‍यांना जागच्या जागी थांबवून झालेली चूक दाखवून दिली. राज्यातील 64 हजार 198 शाळांमधील 59 लाख 31 हजार 410 विद्यार्थ्यांनी 15 लाखाहून अधिक व्हिडीओ शेअर केले. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेला या उपक्रमामुळे गती मिळाली आहे.

दुसर्‍या टप्प्यात विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटरिंग करण्याची सवय होण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे जिल्हा समन्वयक मंजुषा पाध्ये यांनी सांगितले. स्वच्छता मॉनिटर उपक्रमात जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शाळा, विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा समन्वयक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकार्यांनी चांगले योगदान दिले आहे.
जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील जि. प. शाळा कुडली नं. 4, खेड तालुक्यातील पी. जी. कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिर, आर. डी. पाटणे ज्ञानदीप विद्यामंदिर, रत्नागिरी तालुक्यातील मातोश्री कमलाबाई विसपुते इंग्लिश मिडियम स्कूल यांची निवड करण्यात आली.