रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था सुधारणे यासह प्रत्येक व्यक्तीचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याचे रत्नागिरी जिल्हा परिषदेचे नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण एच.पुजार यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या जागी मुख्य कार्यकारी अधिकारी पदी किर्ती किरण एच. पुजार यांची नियुक्ती करण्यात आली. यापुर्वी ते नांदेड जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. पदोन्नतीने ते रत्नागिरी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त झाले आहेत. सुट्टीच्या दिवशी पदभार स्वीकारून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण एच.पुजार म्हणाले की, जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य चांगल्या सुविधा देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर येथील स्थानिकांचे दरडोई उत्पन्न वाढवण्यावर माझा भर असेल. त्याकरीता विविध प्रकल्प आणि योजना राबवू. आर्थिक विकास महामंडळ, समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून दरडोई उत्पन्न वाढवण्यावर आमचा भर असेल. तसेच कृषी विभागाशी आम्ही संपर्क साधला आहे. शेती उत्पन्नात वाढ करून दुग्धव्यवसाय, पोल्ट्रीसारख्या व्यवसायाला चालना देऊन येथील नागरीकांचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जलजीवन मिशनसारख्या योजना राबवण्यावर भर देणार आहे. त्याचबरोबर सरकारच्या ज्या योजना आहेत त्या सर्व यंत्रणांशी समन्वय साधून यशस्वीरित्या राबवल्या जातील. जिल्हा परिषदेमध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्या कमी आहेत. त्यादृष्टीनेही आम्ही राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे. शिक्षकांची 10 टक्के पदे रिक्त आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी सुशिक्षित, पदवीधर तरुणांची मदत घेता येऊ शकते का, तशा प्रकारचे प्रस्तावही आम्ही राज्यसरकारला पाठवणार आहोत, असे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण एच. पुजार यांनी सांगितले.