रत्नागिरी:- सहा महिन्यापूर्वी आंतरजिल्हा बदलीने 715 प्राथमिक शिक्षकांना जिल्हा बदलीने परजिल्ह्यात सोडण्यात आले होते. यामुळे हा विषय चांगलाच गाजला होता. आता पुन्हा हा विषय ऐरणीवर आला आहे. बदलीपात्र उर्वरित शिक्षकांना कार्यमुक्त करावे, असे आदेश गेल्या आठवड्यात काढण्यात आले आहेत. जवळपास 300 शिक्षक पुन्हा एकदा परजिल्ह्यात जाण्याच्या तयारीत आहेत. यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा शिक्षणाचा बट्ट्याबोळ होणार हे निश्चित आहे.
गेल्या काही वर्षापासून जिल्ह्यात आंतरजिल्हा बदली शिक्षकांचा विषय गाजत आहे. जिल्ह्यात दरवर्षी शेकडो शिक्षक आंतरजिल्हा बदलीने स्वजिल्ह्यात जातात. तर येणार्यांची संख्याही हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच असते. त्यात शासनाने गेली अनेक वर्षे भरतीच केलेली नाही. तसेच दर महिन्यात निवृत्त होणार्या शिक्षकांची संख्या वाढतच निघाली आहे.
गेल्या 10 वर्षात जिल्हा बदलून जाणार्या शिक्षकांना अगदी कोणत्याही अडथळा न आणता मुक्तहस्ते जि. प. प्रशासन सोडत आहे. राज्य शासनाने या बदलीत पारदर्शकता यावी म्हणून सन 2018-19 मध्ये एक सॉफ्टवेअर विकसित केले होते. मात्र त्यामध्ये त्रुटी होत्या. दरम्यानच्या काळात 2019 मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. जवळपास दोन वर्षे शाळा बंद असल्यामुळे बदली प्रक्रिया झाली नव्हती. त्यामुळे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात या बदल्या ऑनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार या बदल्या ऑगस्ट 2022 मध्ये करण्यात आल्या होत्या. मात्र जिल्ह्यात रिक्त पदांची संख्या बघता त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. तब्बल 715 शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. 10 टक्केपेक्षा जास्त पदे रिक्त असताना आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांना कार्यमुक्त करू नये, असा शासनाचा निकष
आहे.
जिल्ह्यात 20 टक्केपेक्षा जास्त पदे रिक्त होती. शेवटी त्याला बगल देत एप्रिल 2023 मध्ये या 715 शिक्षकांना परजिल्ह्यात सोडण्यात आले.
या 715 जणांना परजिल्ह्यात सोडण्यात आल्याने जिल्ह्याची शैक्षणिक अवस्था फार बिकट बनली होती. रिक्त पदांची संख्या दोन हजारच्या घरात गेली. यावेळी आंदोलनही करण्यात आले. मात्र त्याला तात्पुरत्या हंगामी शिक्षकांची नियुक्ती करून हा विषय बंद करण्यात आला होता. आता मात्र पुन्हा आंतरजिल्हा बदलीचा विषय ऐरणीवर आला आहे. 23 ऑगस्ट रोजी शासनाने आंतरजिल्हा बदलीबाबत एक परिपत्रक काढले आहे.
शासनाकडून जारी केलेल्या या परिपत्रकात ज्या शिक्षकांना रिक्त जागा नसल्याने बदली मिळाली नाही अशा शिक्षकांची यादी संबंधित जिल्हा परिषदेने करून घ्यावी आणि त्यांना तात्काळ सोडण्यात यावे. तसेच या शिक्षकांना सोडताना 10 टक्केपेक्षा कमीची अट घालण्यात येऊ नये, असे स्पष्ट म्हटले आहे. या आदेशावर शासनाचे उपसचिव पी. डी. देशमुख यांची स्वाक्षरी आहे.
या नव्या आदेशानुसार जवळपास 300 पेक्षा जास्त शिक्षक या बदलीसाठी पात्र आहेत. एकूण 1 हजार 100 जणांनी बदलीसाठी अर्ज केले होते. त्यापैकी 715 जणांना सोडण्यात आले. यामुळे पुन्हा 300 शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने सोडण्यात येणार हे निश्चित आहे. यामुळे आता जिल्ह्यात निवृत्त होणार्या शिक्षकांची संख्या बघता रिक्त पदांचा आकडा आता अडीच हजारच्या घरात जाणार आहे. भरतीचा अजूनही पत्ताच नाही. यामुळे आता ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण कुणी द्यायचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.