रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचा दरमहाचा पगार सातत्याने विलंब होत आहे. यावरुन प्राथमिक शिक्षकांमध्ये तिव्र नाराजी व्यक्त केली जात होती. यासंदर्भात शिक्षक समितीच्या पदाधिकार्यांनी शुक्रवारी शिक्षण आणि वित्त अधिकार्यांची भेट घेतली. त्यावेळी सविस्तर चर्चेनंतर मे महिन्याचे वेतन १० जूनपर्यंत करण्यात येईल असे आश्वासन मिळाले आहे.
एप्रिल महिन्याचा पगार उशिराने झाल्यामुळे शिक्षक समितीच्या पदाधिकार्यांनी अधिकार्यांबरोबर चर्चा केली. यावेळी उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्यासह शिक्षण विभागाचे प्रतिनिधी श्री. पिलणकर, श्री. कांबळे यांच्यासह श्री. बेर्डे उपस्थित होते. पगाराची नव्याने सुरुवात आहे. त्यामुळे अचानक उद्भवणार्या समस्या शोध व निराकरण यामध्ये विविध टप्प्यावर विलंब झाला असल्याचे सर्वांसमोर त्यांनी स्पष्ट केले. सुरुवातीला ट्रेझरीमध्ये व नंतर एरर आल्यामुळे अपेक्षित वेळेत पगार जमा होऊ शकले नाही. यावर उपाययोजना सुरू असल्याची माहिती दिली. आवश्यक त्या सूचना संबंधिताना देण्यात येत आहेत. शिक्षण व वित्त विभाग वेळीच पगार होण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्नशील असल्याची भूमिका मांडण्यात आली. वारंवार त्याच चुका झाल्या तर त्यांना लेखी पत्र काढण्यात येणार आहे. त्या होऊ नयेत यासाठी अधिक भर देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. पगार उशिरा होण्याच्या वारंवार होणार्या कारणांमुळे शिक्षकांत प्रचंड नाराजीचे वातावरण आहे, हे संघटनेचे वतीने स्पष्ट करण्यात आले. सर्व मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून मे पगाराचे अनुदान उपलब्ध असल्याने पगार बिल तयार झाले असून सोमवारी ट्रेझरीला दिला जाईल. बुधवारी ८ जूनपर्यंत सिएमपी झाली तर या महिन्याच्या १० तारखेपर्यंत मे, जून महिन्याचा पगार करण्यात येणार आहे. मे महिन्याची सर्व तालुक्यांची बिले प्राप्त झाली आहेत. शिक्षण व वित्त विभागातील कार्यवाही पूर्ण करून सोमवारी बिले कोषागार कार्यालयाला सादर होतील. या महिन्यानंतर अनुदान वेळीच उपलब्ध झाले तर १ ते ५ तारीख दरम्यान दरमहाचे निश्चितपणे पगार करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे वित्त विभागाकडून सांगण्यात आले. ऑनलाईन यंत्रणेद्वारे लवकर पगार होतील, मात्र अद्याप आपली जिल्हाभरातली यंत्रणा नव्याने काम करत असल्याने बिनचूक व परिपूर्ण काम करण्याकडे लक्ष देत आहे. त्यात आलेल्या अनुभवातुन सुधारणा करण्यात येत आहे. शिक्षण व वित्त विभाग प्राथमिक शिक्षक पगाराच्या बाबीकडे दुर्लक्ष करत नाही असेही स्पष्ट करण्यात आले. वेळीच सिस्टीममध्ये दुरुस्ती व्हावी व पुन्हा पुन्हा त्याच व नवीन चुका होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी अशी अपेक्षा संघटनेतर्फे सांगण्यात आले. यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश काजवे, शिक्षण समिती सदस्य प्रभाकर खानविलकर, नवनाथ पांचाळ, अरविंद जाधव, सीताराम राणे, पंकज जोशी, सौ. अवनी कुष्टे, श्री. खेडेकर, श्री. वासावे, शिवाजी जाधव, सचिन आखाडे आदी शिक्षक समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.