शिक्षक संचमान्यतेमुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या नोकरीवर येणार गदा?

रत्नागिरी:- राज्यात पवित्र पोर्टलमार्फत शिक्षणसेवक पदावर नियुक्त झालेले शिक्षक संचमान्यतेमुळे अतिरिक्त ठरत आहेत. शिक्षणसेवकांच्या समायोजनाबाबत कोणताही ठोस शासननिर्णय नसल्यामुळे त्यांच्या समायोजनाबाबत कोणताही निर्णय होत नाही. त्यामुळे संबंधित शिक्षकांच्या नोकरीवरच ग़दा आल्याची धक्कादायक माहिती संबंधित शिक्षकांनी दिली आहे.

पवित्र पोर्टलअंतर्गत नियुक्त शिक्षणसेवक शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या (मागील वर्षाच्या) सद्य:स्थितीत चालू असलेल्या संचमान्यतेत विद्यार्थिसंख्येअभावी सरल पोर्टलवरील आधार वैधता न झाल्याने किंवा अन्य तांत्रिक अडचणीमुळे अतिरिक्त ठरविले जात आहेत आणि त्यांच्या समायोजन किंवा सेवासंरक्षणसंदर्भात कोणताच ठोस असा शासननिर्णय किंवा सेवा अधिनियम नसल्यामुळे शिक्षणसेवकांवर टांगती तलवार असून, सेवासमाप्तीची वेळ आली आहे. पवित्र पोर्टलअंतर्गत झालेली शिक्षकभरती शासनाचे उदासीन धोरण, कोरोना महामारी, निवडणुका, राजकीय स्थित्यंतर, शासनाचा वेळकाढूपणा, न्यायप्रविष्ट प्रकरणे, शिक्षक पात्रता परीक्षा व शिक्षक भरतीतील घोटाळे आणि शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, अशा अनेक कारणांमुळे 2018 पासून अद्याप चालूच आहे. त्याचा दुष्परिणाम शिक्षणसेवकांच्या भविष्यावर झाला आहे. भरती प्रक्रिया वेळीच पूर्ण झाली असती तर त्यांचा शिक्षणसेवक कालावधी 2020 – 21 या शैक्षणिक वर्षामध्येच पूर्ण झाला असता आणि ते कायम शिक्षक झाले असते. परंतु, भरती प्रक्रिया उशिरा पार पडल्यामुळे संबंधित शिक्षक अतिरिक्त ठरले असून, त्यांच्यासमोर आता त्यांच्या नोकरीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.