कोरोनाचा फटका; 400 शिक्षकांचे बदलीसाठी अर्ज
रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या शासनाने कोरोनातील परिस्थितीमुळे रद्द करतानाच विनंती बदल्यां करण्याचे निर्देश दिले होते; परंतु गेल्या आठ दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेतील कर्मचारी कोरोना बाधित आढळल्यामुळे विनंती बदल्यांची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. ती प्रक्रिया करावयाची की नाही याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. तत्पुर्वी जिल्ह्यातील सुमारे चारशे शिक्षकांनी बदल्यांसाठी शिक्षण विभागाकडे अर्ज केले आहेत.
शासनाच्या आदेशानुसार 15 टक्के बदल्यांची प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्हा परिषदेत गेले महिनाभर कार्यवाही सुरु होती. प्राथमिक शिक्षक वगळता अन्य सर्व कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. पण कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या रद्द कराव्यात अशी मागणी जिल्हा परिषदेने शासनाकडे केली होती. एकाचवेळी 900 शिक्षकांना समुपदेशनासाठी उपस्थित ठेवणे शक्य नव्हते. शासनानेही प्रशासकीय बदल्या रद्द करण्याचे आदेश दिले; मात्र विनंती बदल्यांसाठीचा मार्ग खुला ठेवला होता. त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून कार्यवाही सुरु होती. गेल्या चार ते पाच दिवसात जिल्हा परिषदेत सुमारे 11 कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. त्यामुळे सध्या 10 टक्केच कर्मचारी उपस्थिती ठेवण्यात येत आहे. या परिस्थितीत विनंती बदल्यांवर कार्यवाही करणे अशक्य आहे. त्यामुळे ही प्रक्रिया कशी राबवायची असा प्रश्न प्रशासनापुढे आहे. दोन दिवसांपुर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, शिक्षण सभापती सुनील मोरे यांनी चर्चा केली. प्रक्रिया राबविण्याबाबतचा निर्णय चार दिवसांवर ढकलण्यात आला आहे. सध्यातरी विनंती बदल्या होतील किंवा नाही याबाबत साशंकताच व्यक्त केली जात आहे. प्राथमिक शिक्षण विभागाकडून विनंती बदल्यांसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांकडून अर्ज मागविण्यात आले होते.
आतापर्यंत 400 प्रस्ताव आले आहेत. यामध्ये बहूतांश शिक्षक हे राजापूर तालुक्यातील आहेत.
गेल्यावर्षी झालेल्या ऑनलाईन बदली प्रक्रियेत रिक्त असलेल्या तालुक्यांमध्ये शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या होत्या. यामध्ये अनेक शिक्षकांवर अन्याय झाला. याबाबत तिव्र नाराजी व्यक्त केली जात होती. यंदाच्या बदलीमध्ये त्यांना विनंतीने इच्छीत ठिकाणी बदली घेण्याची संधी शासनाने दिली आहे. त्यामुळे विनंतीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी पहायला मिळत आहे. जिल्ह्यात पावणेसहा हजार शिक्षक कार्यरत आहेत.









