रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या विनंती बदल्या रखडल्या असून त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. कोरोनामुळे प्रशासकीय बदल्या शासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विनंती बदल्यांच्या माध्यमातून गतवर्षी दुर्गम भागात गेलेल्या शिक्षकांना दिलासा मिळण्याची शक्यता होती; मात्र बदल्यांची प्रक्रिया करण्यासाठी पदाधिकार्यांकडून हिरवा कंदिल मिळत नसल्याने विनंती करणार्या शिक्षकांचा हिरमोड झाला आहे. शिक्षण विभागाकडे पावणेचारशे प्रस्ताव आले आहेत.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या या दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादग्रस्त ठरतात. यंदाही कोरोनातील परिस्थितीमुळे विनंत बदल्यांची प्रक्रिया थांबलेली आहे. एकाचवेळी शेकडो शिक्षकांना एकत्र आणून बदली प्रक्रिया राबवणे कोरोनामुळे अशक्य असल्याने प्रशासकीय बदल्या रद्द करण्यात आले; मात्र शिक्षकांना दिलासा देण्यासाठी शासनाने विनंती बदल्यांची प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले होते. बहूतांश जिल्ह्यात विनंती बदल्या करण्यात आल्या. तरीही रत्नागिरी जिल्ह्यातील प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. गणशोत्सवानंतर निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण ती फोल ठरली आहे. अजुनही पदाधिकार्यांकडून हिरवा कंदिल मिळालेला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बदल्यांची प्रक्रिया होणार असल्यामुळे गतवर्षी बदली झालेले अनेक शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गतवर्षी झालेल्या ऑनलाईन बदली प्रक्रियेत अन्याय झालेल्या किंवा चुकीने दुर्गम भागात नियुक्ती झालेल्या शिक्षकांना यंदा सामावून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कार्यवाहीही सुरु झाली होती. प्रशासकीय बदल्या रद्द झाल्याने त्यांच्या आशा धुळीस मिळाल्या. विनंती बदल्याच्या माध्यमातून तालुक्याबाहेर गेलेले शिक्षक आपल्या तालुक्यात येण्यासाठी धडपड करत आहेत. ही प्रक्रिया राबविली जात नसल्याने त्यांच्यामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान आंतरजिल्हा बदल्या होण्यापुर्वी विनंती बदल्या कराव्यात अशी मागणी केली जात आहे.