रत्नागिरी:- राज्यातील शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी 2022 ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांची पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार टीईटी परीक्षेत गैरप्रकार प्रकरणातील उमेदवारांना स्वप्रमाणपत्र सादर करण्याची संधी दिली जाणार असून, संकेतस्थळावर नोंदणीसाठी शिक्षण विभागाने दुसर्यांदा 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 2018 आणि 2019 मध्ये गैरप्रकार केल्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने नऊ हजारांपेक्षा जास्त उमेदवारांना प्रतिबंधित केले होते. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 ला प्रविष्ट होता येणार नाही, असा निर्णय दिला होता.
प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय
टीईटी परीक्षेत गैरप्रकार केल्यामुळे प्रतिबंधित केलेल्या उमेदवारांना न्यायालयाच्या आदेशानुसार स्वप्रमाणनाची संधी देत पदभरती प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाणार आहे. मात्र, गैरप्रकार केलेल्या उमेदवारांना संधी दिल्याने प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय होणार आहे.