रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी वैयक्तिक माहिती ऑनलाईन पोर्टलवर भरुन घेण्यात आली आहे; मात्र अजुनही अवघड क्षेत्रातील शाळा, रिक्त पदांची माहिती आणि शिक्षकांना हव्या असलेल्या तीस शाळांची यादी भरण्याचे आदेश ग्रामविकास विभागाकडून प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे दिवाळीपुर्वी ही प्रक्रिया होणार की नाही याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
दिवाळीची सुट्टी २० ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरपर्यंत या कालावधीत सुट्टी आहे. ८ नोव्हेंबरला गुरुनानक जयंती असल्याने त्या दिवशीही सुट्टी आहे. ९ नोव्हेंबरपासून शाळा पुन्हा पूर्ववत सुरू होतील. दिवाळीच्या निमित्ताने यंदा १८ दिवस शाळा बंद राहतील. दिवाळी सुट्टीचे वेध लागले असले तरीही जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया कधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महिन्याभरापुर्वी जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९८ शाळांमधील शिक्षकांची आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया झाली. त्यात अडीचशे शिक्षकांचा समावेश आहे; मात्र रिक्त पदांमुळे त्यांना बदलीच्या ठिकाणी सोडण्यात आलेले नाही. ही प्रक्रिया झाल्यानंतर लगेचच जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरु होईल अशी अपेक्षा होती. पण अजुनही तसे आदेश ग्रामविकास विभागाकडून प्राप्त झालेले नाहीत. जिल्ह्यात पावणेसहा हजार शिक्षक आहेत. जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया राबविताना प्रथम अवघड क्षेत्रातील शाळांची यादी अपलोड करण्याचे आदेश येतील. त्यानंतर ही प्रक्रिया खर्या अर्थाने सुरु होईल. पुढील टप्प्यात शिक्षकांची रिक्त पदे यादी भरली जाईल आणि शेवटी इच्छुक शाळांची यादी भरावयास लागणार आहे. तालुक्यातील रिक्त पदांचा समतोल साधण्यावर यामध्ये भर राहणार आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांना तालुक्याच्या बाहेर जावे लागण्याची शक्यता आहे. तिन वर्षांपुर्वी झालेल्या ऑनलाईन बदलीमध्ये आठ टक्के शिक्षकांना तालुक्याच्या बाहेर जावे लागले होते. तेव्हा सर्वाधिक पदे राजापूर तालुक्यात होती.









