सोमवारी होणार्या बैठकीकडे नजरा
रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून एकाचवेळी नऊशे शिक्षकांना समुपदेशनासाठी एकत्र बोलावणे शक्य होणार नाही असा सूर प्रशासकीय यंत्रणेतून उमटत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या बदल्या रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात सोमवारी (ता. 3) जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड आणि शिक्षण सभापती यांच्यातील बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे.
शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेतील प्रशासकीय आणि विनंती बदल्यांची प्रक्रिया सुरु झाली आहे. 15 टक्के बदल्यांना शासनाने मान्यता दिली होती. त्यानुसार मागील आठवड्यात विविध विभागांच्या सुमारे दीडशेहून अधिक बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे; मात्र शिक्षकांचा केडर अधिक असल्यामुळे त्यांची प्रक्रिया जिल्हा परिषदेने लांबणीवर टाकलेली होती. यासंदर्भात शिक्षक संघटनांशी अध्यक्ष बने आणि शिक्षण सभापती सुनील मोरे यांनी संवाद साधला. त्यामध्ये शिक्षकांनी बदल्या झाल्या पाहिजेत अशी भुुमिका घेतलेली होती. जिल्ह्यात सुमारे सहा हजारहून अधिक शिक्षकांची संख्या आहे.