शिक्षक बदल्यांची दुसरी यादी ९ जानेवारीला जाहीर होणार 

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीच्या दुसर्‍या टप्प्यात संवर्ग २ मध्ये पती-पत्नी एकत्रिकरणात १०६ जणांनी ऑनलाईन प्रस्ताव सादर केला आहे. बदलीसाठी आवश्यक शाळांचे विकल्प त्यांनी भरले असून ९ जानेवारीला यादी जाहीर होणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा पहिला टप्पा मागील आठवड्यात पूर्ण झाला असून दुसर्‍या टप्प्यासाठी पात्र ठरलेल्या शिक्षकांना शाळांचे विकल्प भरण्यासाठी मुदत दिली गेली होती. तत्पुर्वी पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गत १०६ जणांनी ऑनलाईन प्रस्ताव दिलेले होते. पहिल्या टप्प्यात बदलीसाठी पात्र ठरलेल्या शिक्षकांनी विकल्प भरताना आयत्यावेळी माघार घेतली होती. त्यामुळे संवर्ग १ मधील तीस टक्केच बदल्या झाल्या. परंतु संवर्ग २ मधील अर्ज भरलेल्या सर्वच्या सर्व शिक्षकांनी विकल्प भरले आहेत. त्यामुळे शंभर टक्के शिक्षक बदलीसाठी सकारात्मक आहेत. बदलीसाठी एक ते तिस शाळांचे प्राधान्यक्रम भरले आहेत. शिक्षकांच्या बदल्या कुठे झाल्या याची यादी ९ जानेवारीला प्रसिध्द झालेली आहेत.