शिक्षक आंतरजिल्हा बदल्यांवर अनिश्चिततेचे ढग 

रत्नागिरी:- प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत अद्यापही अनिश्‍चितता असल्यामुळे आंतरजिल्हा बदल्याही लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोनातील परिस्थिती आणि शिक्षकांची वाढती रिक्त पदे यामुळे आंतरजिल्हा बदलीने शिक्षकांना सोडू नये या मानसिकतेमध्ये जिल्हा परिषद पदाधिकारी आहेत.

राज्य शासनाने आंतरजिल्हा बदलीने जाणार्‍या प्राथमिक शिक्षकांसाठी हिरवा कंदिल दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 330 शिक्षक परजिल्ह्यात जाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रिक्त पदांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढणार आहे. शासनाने आंतरजिल्हा बदलीसाठी रिक्त पदे दहा टक्केपेक्षा कमी असणे आवयक आहे अशी अट टाकली आहे; परंतु त्यातही मेख मारली असून सरल पोर्टलद्वारे भरती योग्य असलेली पदे रिक्त दाखवू नयेत असे बजावले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे पावणेतीनशे शिक्षकांची पदे रिक्त असतानाही ती भरलेली दाखवावी लागणार आहेत. सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे सरल पोर्टलवरील शिक्षकांच्या नियुक्त्या केव्हा होतील हे आताच सांगणे अशक्य आहे. सरल पोर्टलवरील पदे भरलेली दाखवली तर जिल्ह्यातील नियमित रिक्त पदांचे प्रमाण साडेपाच टक्के होते. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीने जाणर्‍यांचा मार्ग मोकळा होऊ शकतो. सारासार विचार केल्यास नियमित रिक्त जागा, पोर्टलवरील भरावयाची पदे आणि आंतरजिल्हा बदलीने शिक्षक गेल्यानंतर होणारी रिक्त पदे यांचा विचार केल्यास एक हजार शिक्षकांची जिल्ह्यातील शाळांमध्ये कमतरता भासणार आहे.

रत्नागिरी जिल्हा दुर्गम भाग असल्यामुळे अनेक मुले आजही जिल्हा परिषद शाळांचा विचार करत आहेत. रिक्त पदांमुळे अनेक शाळांवर शिक्षकांची नियुक्ती कामगिरीवर करण्यात आली होती. गतवर्षी यावरुन पदाधिकारी विरुध्द प्रशासन आमनेसामने आले होते. यंदाही लोकप्रतिनिधी शिक्षकांना सोडण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. गणेशोत्सवानंतर आंतरजिल्हा बदलीने जाणार्‍या शिक्षकांना सोडावे लागणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात यावर निर्णय घ्यावा लागणार आहे. नियमानुसार बदलीपात्र शिक्षकांना सोडण्याशिवाय प्रशासनापुढे पर्याय नाही. राज्यात आणि जिल्हा परिषदेवर शिवसेनेचीच सत्ता असल्यामुळे स्थानिक पातळीवर जे निर्णय घेतले जातील त्याला शासनाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळणार आहे. परिणामी आंतरजिल्हा बदलीने जाणार्‍यांचे भवितव्य जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांवर अवलंबून राहणार आहे.