शिक्षकांना आंतरजिल्हा बदल्यांचे वेध; पावणेसहा हजार शिक्षक बदलीसाठी इच्छुक 

रत्नागिरी:- आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरीही जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना जिल्हांतर्गत बदल्यांचे वेध लागलेले आहेत. ऑनलाईन पोर्टलवर जिल्ह्यातील पावणेसहा हजार शिक्षकांनी भरलेली माहिती तपासण्याचे काम सुरु आहे. त्यानंतर रिक्त जागांची माहिती आणि शिक्षकांकडून बदलीबाबत जागांची माहिती भरुन घेतली जाणार आहे. ही प्रक्रिया दिवाळीपुर्वी पूर्ण करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरु आहेत.

आंतरजिल्हा बदल्यांसाठी पात्र शिक्षकांची यादी प्रसिध्द होऊन महिना होत आला तरीही जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरु झालेली नाही. २०१९ साली प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यामध्ये ९२ टक्के शिक्षकांना दिलासा मिळाला. तर तालुक्यांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना अन्य तालुक्यात जावे लागले. ऑनलाईन यादी प्रसिध्द झाल्यानंतर काही शिक्षकांनी याविरोधात आवाज उठवला होता; परंतु प्रशासनाकडून तांत्रिक चुकांची दुरुस्ती करुनच बदली प्रक्रिया राबविलेली होती. कोरोनामुळे दोन वर्षे बदल्याच झाल्या नव्हत्या. यंदाही मे महिन्यात होणार्‍या बदल्या पुढे ढकलण्यात आल्या. अजुनही त्याला मुहूर्त सापडलेला नाही. प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी अवघड क्षेत्रातील शाळांची जुनी यादीनुसार कार्यवाही करण्यात येत आहे. अवघड आणि सुगम क्षेत्रात नियुक्ती झालेल्या तारखांसह शिक्षकांची सेवाज्येष्ठता, एकाच शाळेत किती वर्षे काम केले अशी माहिती शासनस्तरावर तपासली जात आहे. त्यासाठी अजुन काही कालावधी लागेल असे जिल्हापरिषदेकडून सांगण्यात आले. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील रिक्त जागांची माहिती पोर्टलवर भरली जाईल. पुढे त्या जागानुसार शिक्षकांकडून इच्छुक शाळांची माहिती भरण्यात येणार आहे. एका शिक्षकाला ३० शाळा प्राधान्यक्रमानुसार भरावायाच्या आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस दिवाळी आहे. त्या सुट्टीपुर्वी जिल्हांतर्गत बदल्यांसाठी पात्र शिक्षकांची यादी जाहीर केली जाईल अशी शक्यता आहे. या कालावधीत बदल्या झाल्या नाहीत, तर पुढील वर्षी बदल्या होतील. दिवाळीसाठी अजून पावणे दोन महिन्याचा कालावधी आहे.