शिक्षकांच्या रिक्त जागांची माहिती ऑनलाईन प्रणालीवर टाकण्याचे आदेश

रत्नागिरी:- जिल्ह्यातंर्गत प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी सर्व प्रकारच्या रिक्त असणार्‍या जागांची माहिती ऑनलाईन प्रणालीवर टाकण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना दिले आहेत.

राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने ऑनलाईन प्रणालीव्दारे राज्यातील आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. 
आता संबंधीत शिक्षकांना नेमणुका दिल्यानंतर आणि 31 ऑगस्ट 2022 पर्यंत सेवानिवृत्त, निधन, तसेच अन्य कारणामुळे रिक्त होणार्या जागा, त्याच प्रमाणे आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांना नेमणूका दिलेल्यानंतरच्या रिक्त जागा आणि संभाव्य रिक्त होणार्‍या अशा सर्व प्रकारच्या रिक्त असणार्‍या जागांची माहिती जिल्ह्यातंर्गत प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी ऑनलाईन प्रणालीवर टाकण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना दिले आहेत.

ग्रामविकास विभागाचे उपसचिव का, गो. वळवी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. या आदेशात नुकत्याच राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे आंतरजिल्हा बदल्या करण्यात आलेल्या आहेत. आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना 5 सप्टेंबरपर्यंत कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आलेले होते. त्यानुसार आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांना संबंधित जिल्हा परिषदांनी शासन निर्णयातील तरतुदीनुसार पदस्थापना देण्याबाबतची कार्यवाही करावी अथवा केलेली असेल.
आता, लवकरच प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईनप्रणालीद्वारेजिल्ह्यांतर्गतबदल्यांबाबतची कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्हा परिषदेत 31 ऑगस्टपर्यंत सेवानिवृत्त, निधन किंवा अन्य कारणामुळे रिक्त झालेली पदे, त्याचप्रमाणे आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केल्यानंतर झालेल्या रिक्त जागा, तसेच आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांच्या समायोजनानंतर उर्वरित रिक्त पदे, संभाव्य रिक्त पदे याबाबतचा संपूर्ण तपशील ऑनलाईन बदली प्रणालीवर अद्ययावत करावी.

तसेच ही माहिती आणि रिक्त पदांची माहिती ऑनलाईन संगणक प्रणालीवर अद्ययावत केल्यानंतर, आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांना पदस्थापना न देता जिल्ह्यांतर्गत बदल्यांबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर शासन निर्णयानुसार समायोजनाने पदस्थापना देण्यात यावी जेणेकरुन एकाच जागेवर दोन शिक्षकांची नियुक्ती होणार नाही. त्यामुळे जिल्ह्यांतर्गत बदल्यांबाबतची कार्यवाही विनाव्यत्यय पार पाडावी, असे वळवी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.