शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला ब्रेक

रत्नागिरी:- जिल्हा परीषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया थांबल्यामुळे परजिल्ह्यात जाणाऱ्या इच्छुकांची निराशा झाली आहे. तर आंतरजिल्हा बदलीला विरोध करणाऱ्या स्थानिकांना दिलासा मिळालेला आहे. आपसी बदल्यांच्या प्रक्रीयेतील त्रुटींमुळे आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया थांबल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षकांची रिक्त पदे वाढत आहेत. त्यामुळे आंतरजिल्हा बदली प्रक्रीयेला जिल्हास्तरावरून विरोध होत आहे. मागील महिन्यात सरल पोर्टलवर शिक्षकांना माहिती भरण्याच्या सुचना दिलेल्या होत्या. पहिल्या टप्प्यात सर्व शिक्षकांनी आपापली
माहिती भरली. दुसऱ्या टप्प्यात पोर्टलवर भरलेली माहिती तपासण्यात आली. त्यानंतर दुरूस्त्याही करून घेण्यात आल्या. हे सर्व पूर्ण झाल्यानंतर
बदलीसाठी इच्छुकांकडून त्या-त्या जिल्हा परिषदांची माहिती भरणे शिल्लक आहे. परंतु जालना जिल्ह्यातील आपसी बदल्यांमधील त्रुटी पूर्ण करण्यासाठी राज्यभरातील सर्व प्रक्रीया थांबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आंतरजिल्हा बदल्या पावसाळ्यात होण्याची
शक्यता आहे. गेल्या काही वर्षात परजिल्ह्यात जाणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढली आहे. त्याचा फटका ग्रामीण भागातील शाळांना बसत असून
शिक्षकांची पदे रिक्त होत आहेत. काही शाळांमध्ये एकच शिक्षक नियुक्त केला जातो. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने ग्रामीण
भागातून लोकांचा विरोध होत आहे.