रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया १८ जुलैनंतर सुरु होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांची पदे १५ टक्केपेक्षा अधिक रिक्त असल्यामुळे आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया फक्त पूर्ण करुन ठेवली जाईल; मात्र बदली पात्र शिक्षकांना सोडण्यात येणार नाही. आंतरजिल्हा बदल्या झाल्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्हांतर्गतसाठी शिक्षकांचे ऑनलाईन अर्ज भरुन घेतले जाणार आहेत.
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया ३१ मे पर्यंत पूर्ण करावयाची होती; मात्र सुगम, दुर्गम शाळांच्या निवडीची प्रक्रियाला लांबल्यामुळे बदल्यांबाबत साशंकताच होती. तरीही शिक्षण विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षकांची वैयक्तिक माहिती ऑनलाईन पोर्टलवर भरुन ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे कार्यवाही झाली असून २३ जुनला ऑनलाईन माहिती भरण्याचे काम पूर्ण झाले. त्यानंतर राज्यातील सरकार बदल झाल्यामुळे बदल्यांची प्रक्रिया थांबेल अशी शक्यता होती. परंतु प्रशासनाकडून कार्यवाही सुरुच ठेवण्यात आल्यामुळे पहिल्या शैक्षणिक सत्रानंतर बदल्या केल्या जाऊ शकतात. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची पदे १५ टक्केहून अधिक रिक्त असल्याने आंतरजिल्हा बदल्या करु नयेत असे आदेश होते. पण शासनाने काही दिवसांपुर्वी काढलेल्या परिपत्रकानुसार ही प्रक्रिया पूर्ण करुन ठेवली जाणार आहे. रिक्त पदानुसार बदली झालेल्या शिक्षकांना सोडण्याचे निर्णय घेतले जातील. आंतरजिल्हा बदल्यांसाठी शिक्षकांडून ऑनलाईन अर्ज भरुन घेण्यात येणार आहे. ही प्रक्रिया १८ जुलैनंतर सुरु होण्याची शक्यता असून याला शिक्षण विभागाकडूनही दुजोरा दिला आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर बदल्यांची यादी जाहीर केली जाईल. ही प्रक्रिया झाल्यानंतर जिल्हांतर्गतसाठी शिक्षकांकडून बदली पाहिजे असलेल्या शाळांच्या नावे मागवून घेतली जातील. प्राधान्यक्रमानुसार तीस शाळांची नावे शिक्षकांना ऑनलाईन पोर्टलवर भरावयाची आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात याला आरंभ होईल. सरकारमधील मंत्रीमंडळ निश्चित झाल्यानंतर गणपतीच्या सुट्टीनंतर किंवा दिवाळी सुट्टीवेळी या बदल्या होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.









