रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची झाली. टेंभे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्याने शिंदे गटाच्या शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख कांचन नागवेकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. शिंदे गटाच्या महिला तालुकाप्रमुख कांचन नागवेकर यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
रत्नागिरी तालुक्यातील टेंभे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी उभ्या असलेल्या कांचन नागवेकर यांचा पराभव झाल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेच्या त्या रत्नागिरी महिला तालुकाप्रमुख होत्या. गेली दहा वर्ष टेंभे ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी कांचन नागवेकर होत्या. यावेळी झालेल्या निवडणुकीत त्यांना पराभूत व्हावे लागले. त्यामुळे शिंदे गटाच्या शिवसेना महिला तालुकाप्रमुख या पदाचा त्यांनी राजीनामा जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्याकडे कालच दिला.
दरम्यान, कांचन नागवेकर यांनी आपल्या राजीनाम्याबाबत स्पष्ट केले की, मी टेंभे गावातून सरपंच पदासाठी निवडणूक लढवत होते. पण या निवडणुकीत मी 300 मतांनी पराभूत झाल्याने नैतिक जबाबदारी स्वीकारुन मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा जिल्हाप्रमुख यांच्याकडे सादर केला आहे.