शिंदे गटाच्या भवितव्याचे उत्तर काळच देईल: आ. भास्कर जाधव

रत्नागिरी:- नवीन जवळ आलेल्या छोट्या पक्षांचे काय झाले हे आतापर्यंत अनेकवेळा पाहीले आहे. गरजेपुर्तेच त्यांना जवळ घेतले जाते, त्यांचा वापर केला जातो. त्यामुळे भाजपच्या जवळ असलेल्या शिंदे गटाच्या भवितव्याचे उत्तर काळच देईल, असे सांगत उध्दव ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटाला चिमटा काढला. तसेच छोट्या पक्षांना संपवायचे असा एक कलमी कार्यक्रम भाजपकडून चालवला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना आमदार जाधव म्हणाले, भाजपकडून बलाढ्य शिवसेनाला संपवण्यासाठी प्रयत्न केले गेले; परंतु हा पक्ष संपणारा नाही. शिवसेनाप्रमुखांच्या विचारधारेवर चालणारा हा पक्ष आहे. आतापर्यंत राज्यातील अनेक छोट्या नवीन पक्षांना भाजपने जवळ केले. त्यात महादेव जानकार, सदाभाऊ खोत, विनायक मेटे यांची उदाहरणे देता येतील. या छोट्या पक्षांना जवळ घेतले, ते पक्ष किती वाढले. गरजे पुरताच त्याचा वापर केला जातो. आता शिंदे गटातील किती आमदार भाजपमध्ये जातात हे आताच सांगता येणार नाही; परंतु छोट्या पक्षाची उदहारणे पाहता शिंदे गटाच्या भविष्याचे उत्तर काळच देईल.

निवडणुक आयोगामध्ये सुरु असलेल्या सुनावणीबाबत आमदार जाधव म्हणाले, लोकशाही वाचायची असेल तर शिंदे गटातील सर्व आमदारांना तात्काळ निलंबीत केले पाहीजे. पक्षांतर्गत बंदी विरोधी कायद्याला गट करणे मान्यच नाही. जे मुळ पक्षातून बाहेर गेले त्यांना दोनच पर्याय असतात. त्यांचे ताबडतोड निलंबन किंवा दुसर्‍या पक्षात जाणे हा होय. शिवसेनेतील पक्षांतर्गत निवडणुक घेणे हा अधिकार निवडणुक आयोगाचा आहे. विधानपरिषदेच्या बारा आमदारांची मुदत संपली तरीही त्यावर निर्णय झालेला नाही. पक्षप्रमुखांची मुदत संपल्याची बाब आयोगाच्या लक्षात आणून दिली. त्यानुसार मुळ पक्षप्रमुखांना मुदत वाढ किंवा पक्षप्रमुख निवडण्याचा पक्षाला अधिकार देणे हे आयोगाचे काम आहे. त्यामुळे आपली स्वायत्तता पणाला लावायची हे आयोगानेच ठरवायले हवे.

भाजपचे एकेकाळी दोनच खासदार होते, तेव्हा कुणीही टींगल केली नव्हती. आता शिवसेनेची टिंगलटवाळी भाजपकडून केली जात आहे. आम्ही वाजपेयी, अडवाणी यांचा सुसंस्कृतपणा, विजयाराजे शिंदे यांचा खानदानीपणा पाहिला, तो आताच्या भाजपत राहीलेला नाही. त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे. सध्या फक्त एक कलमी कार्यक्रम राष्ट्रीय अध्यक्षांपासून राज्यातील नेत्यांपर्यंत आहे. तो म्हणजे, छोटे मोठे पक्ष शिल्लक राहता कामा नयेत. ते संपले पाहीजेत असेच धोरण अवलंबले जात आहे, असे आमदार जाधव यांनी सांगितले.

माजी आमदार संजय कदम यांच्या प्रवेशाविषयी ते म्हणाले, रामदास कदम यांच्या अती बोलण्यामुळे मी ठरवलं आहे की, दापोली-खेडमधील पुढचा आमदार हा उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचा निवडून आणणार. त्याची जबाबदारी घेतली असून तेथेही गोळाबेरीज केली आहे. एखादे ऑपरेशन आम्ही असे करतो. ते पूर्ण झाल्यावरच संबंधिताला कळते. खेड, दापोली तालुक्यातील आणखीन काही कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. संजय कदमांचा प्रवेश हा त्याचाच एक भाग असून यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे. ज्याचा आमदार निवडून आला त्याची ती जागा हा निकष आहे. येथून सेनेचा आमदार निवडून आल्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेनेचा क्लेम आहे. तरीही तशी वेळ उद्भवणार नाही. महाविकास आघाडीत समन्वय आहे.
रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून तुम्ही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहात का, या प्रश्‍नावर आमदार जाधव म्हणाले, गुहागर मतदार संघ माझ्यासाठी पूर्णतः सुरक्षित आहे. तिथे कोणीही आले तरीही त्याला संधी मिळणार नाही; मात्र पक्षाला ज्यांनी त्रास दिला आहे त्यांना धडा शिकवायचा आहे असे पक्षप्रमुखांना वाटत असेल तर यशापयशाची किंवा निर्णय बरा-वाईट लागेल याची चिंता न करता ते सांगतील त्या मतदार संघातून निवडणूक लढवण्यास सज्ज आहे. मी लढणारा शिवसैनिक आहे. पाठीमागे हात घेऊन बसणारा नाही. जो कोणी उमेदवार समोर येईल त्याला दे माय धरणी केल्याशिवाय राहणार नाही.

आंजर्ले, केळशीतील व्यावसायिक चिंताग्रस्त

दापोलीतील साई रिसॉर्टवरील कारवाई वैयक्तिक सुडाचाचा भाग आहे. या कारवाईमुळे सगळे व्यावसायिक चिंताग्रस्त झाले आहेत. आंजर्ले, केळशी परिसराचा गोव्याप्रमाणे विकास झाला आहे. करोडे रुपये कर्ज काढून मोठी हॉटेल, व्यवसाय उभारले गेले. या सगळ्यांवर हातोडा फिरण्याची भिती निर्माण झाली आहे. हजारो व्यावसायिकांना नोटीस आल्या आहेत. किरीट सोमय्यांनी आणलेला हातोडा कोकणातील पर्यटनावर मारायला होता. त्याचा त्रास व्यावसायिकांना होत आहे. ज्यांना निवडून दिले त्यांनीच या लोकांच्या पोटावर पाय आणला. रोजगार देण्याऐवजी तो मातीत घालण्याचे काम ते करत आहेत. त्याची परतफेड मतदानावेळी करतील, असा इशारा आमदार जाधव यांनी दिला.