रत्नागिरी:- शासनाच्या पर्ससीनबाबतच्या पूर्वग्रह दुषित आणि आडमुठ्या धोरणाविरोधात रत्नागिरी तालुका व जिल्हा पर्ससीननेट मच्छिमार असोसिएशनने एल्गार पुकारला आहे. पर्ससिननेट मच्छीमारांसह महिलांनी सोमवारपासून (ता. 3) सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयापुढे साखळी उपोषणाला सुरवात केली आहे. हे आंदोलन उग्र करण्याचा इशारा दिला आहे.
मत्स्यव्यवसाय खात्याने 5 फेब्रुवारी 2016 च्या शासन निर्णयानुसार नवीन पर्ससिन नियम लागू केले आहेत. त्यात पर्ससिनधारक मच्छीमार 1 जानेवारी ते 31 मे पर्यंत पर्ससीन व्यवसाय राज्य शासनाच्या जलधी क्षेत्रात कायदेशीरपणे चालू ठेऊ शकत नाहीत. पर्ससिननेटद्वारे केली जाणारी मासेमारी प्रदूषणकारी आणि विध्वंसकारी असल्याची खोटी बतावणी पारंपरिक मच्छीमार करत आहेत. त्यांचे म्हणणे योग्य मानून पर्ससीन ट्रॉलर कायमचे बंद करण्याचा विचार करत आहे. अवघे चार महिने पर्ससिननेटला परवानगी दिली असून आठ महिने त्यावर बंदी घातली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे पर्ससिन धारक मच्छिमारांना उध्वस्त केले आहे. केंद्र सरकारच्या मालकीची बंदरे राज्य शासन वापरासाठी मज्जाव करून घटनेत नागरिक दिलेल्या मुलभूत हक्कांची पायमल्ली करत आहे. त्यामुळे हजारो पर्ससीनधारक आणि त्यावर अवलंबुन असणारे लाखो खलाशी, व्यापारी आपल्या पोटापाण्याच्या व्यवसायाला मुकले आहेत. या प्रचंड अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पर्ससीनधारक मच्छीमार प्रचंड उपासमारी व बेकारी विरोधात सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयासमोर साखळी उपोषण करत आहे. यामधून मार्ग निघाला नाही, तर उग्र जनआंदोलन आणि शेवटी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा मच्छीमारांनी दिला आहे. याचे नेतृत्व बशीर मुर्तुझा, जाविद होडेकर, अजित शिंदे, पुष्कर भुते, जित बिर्जे, शाहीद मिरकर, मन्सूर सोलकर, ओमकार मोरे, इफतिकार साखरकर, इम्रान मुकादम यांच्यासह शेकडो मच्छीमार सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचा सहभागही होता.









