किरीट सोमय्या; जिल्हाधिकारी देखील जबाबदार असल्याचा आरोप
रत्नागिरी:- कोरोना कालावधीत दापोली मुरुड येथे दहा करोडचे रिसॉर्ट उभारणार्या रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी दाखल करायला पाहिजे तसेच पदाचा दुरुपयोग करणार्या परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केली. या प्रकरणात जिल्हाधिकारीही जबाबदार असल्याचा आरोप करतानाच तलाठी व ग्रामसेवक यांना निलंबित करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणीही त्यांनी कली.
दापोली येथील मुरुड समुद्रकिनारी सीआरझेडचे उल्लंघन करुन दहा कोटी रुपयांचे अनधिकृत रिसॉर्ट उभारण्यात आले आहे. या रिसॉर्टचे अनौपचारिक उद्घाटनही जानेवारी 2021मध्ये करण्यात आले. कोरोना कालावधीत हे रिसॉर्ट बांधले गेले आहे.ही शेतजमीन असतानाही कोणत्याही परवानग्या यासाठी घेतल्या गेल्या नसल्याचे सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तत्पूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
याबाबत बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, आपण या रिसॉर्ट विषयी तक्रार दाखल केल्यानंतर पालकमंत्री अनिल परब यांनी ग्रामपंचायतीशी पत्र व्यवहार करुन शेतजमिनीवरील रिसॉर्टसाठी बिनशेतीकर भरला. हा कर ग्रामसेवकांनी कसा काय भरुन घेतला. कागदोपत्री शेतजमिन असतानाही बिनशेतीकर कसा काय भरुन घेतला जाऊ शकतो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यात ग्रामसेवक व तलाठी या दोघांनाही निलंबीत करुन त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी आपण जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. यावर योग्य ती चौकशी करण्याचे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकार्यांनी दिले असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. या सर्व प्रकरणाला रत्नागिरीचे जिल्हाधिकारीही तेवढेच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पालकमंत्री परब यांनी साठे या व्यक्तीकडून एक कोटी रुपयांना 2017मध्ये शेतजमीन विकत घेतली. त्याबाबत करारपत्र करण्यात आले होते. या समुद्राजवळील जमिनीवर कोट्यवधीचे रिसॉर्ट उभारण्यात आले. आपण तक्रार दाखल केल्यानंतर अनिल परब यांनी चार दिवसातच जागेचा चार वर्षाचा बिनशेती दस्त ग्रामपंचायतीमध्ये भरण्यास दिला होता. मात्र ही जागा सदानंद कदम यांना विकताना त्यावर ती शेतजमीन असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे परब यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी दाखल करावी अशी मागणी आपण केली आहे.
अनिल परब व सचिन वाजे यांचे संबंध आहे. त्याबाबत एनआयए व सीबीआयकडे आपण तक्रार केलेली आहे. वाजे यांनी दिलेले पैसेच या रिसॉर्टसाठी वापरले गेले असल्याचा दावाही त्यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. याबाबत आपण राज्यपालकांकडेही तक्रार केली असून त्यांनी एसआयटी चौकशी करावी अशी सूचना राज्य सरकारला केली आहे. ही जागा शेतजमिन असल्याचा व त्यावर मागील दीड वर्षात बांधकाम झाल्याचे गुगल मॅपचे पुरावे आपल्याकडे असल्याचे सांगतानाच याबाबत राज्य शासनाने कारवाई न केल्यास कोर्टात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी किरीट सोमय्या यांच्यासोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, शहराध्यक्ष सचिन करमरकर आदी उपस्थित होते.