शासनाकडून नमन, जाखडी लोककलांना मिळणार राजाश्रय

रत्नागिरी:-
कोकणातील अनेक लोककला आज लोकप्रिय आहेत. त्यातील न’न आणि जाखडी ह्या लोककलांना राज्य शासनाने मान्यता द्यावी अशा आशयाची मागणी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्याकडे रत्नागिरी जिल्हा नमन मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे आणि हरिश्चंद्र बंडबे, श्रीकांत बोंबले ह्यांनी केली. ह्या मागणीची तात्काळ दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी घेत उदय सामंत ह्यांच्या विनंतीनुसार मागणी तात्काळ मान्य केली.

रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील नमन, जाखडी या लोककला आजही येथील मंडळींनी जीवापाड जपल्या आहेत. पण नमन लोककलेची साधी नोंदही शासकीय दरबारी नाही. नमन कलाकारांची ‘रात्री राजा आणि सकाळी डोक्यावर बोजा’ अशी वाईट स्थिती आहे. त्यामुळे या लोककलेला राजाश्रयाची खर्‍या अर्थाने गरज आहे. नमन अनेक नाट्यसंमेलनांच्या माध्यमातून जगभर पोहचले. पण कोकणातील नमन, जाखडी सादर करणारी हजारो मंडळे मात्र दुर्लक्षित आहेत, राजाश्रयाच्या प्रतिक्षेत आहेत. या कलेची शासन दरबारी आजही नोंद व्हावी अशी मागणी आहे. कोकणात नमन तथा खेळे, शक्तीतुरा म्हणजे जाखाडी नृत्य या कलांचा समावेश आहे. कोकणातील विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यातील नमन या लोककलेची प्रसिद्धी जगभर पसरली आहे. श्री गणरायाचे आगमन, मृदंग, ढोलकीच्या तालावर ठेका धरणारी नटखट गवळण, काल्पनिक, पौराणिक वगनाट्य सादर करणारी ही नमन लोककला कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना शासनाचे अनुदान नसतानाही कोकणवासीय जोपासत आहेत. या लोककलेला जागर प्राचीन काळापासून रत्नागिरी, चिपळूण, गुहागर, दापोली, खेड, संगमेश्वर, लांजा, राजापूर, मंडणगड या तालुक्यातील लोकांनी शासनाच्या अनेक योजना या लोककलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवून जनजागृती करण्याचे काम पार पाडले आहे. आज बदलत्या काळाप्रमाणे नवे-जुने यांचा स्वीकार करत आजचे आधुनिक नमन मुंबईसह कोकणात पाहावयास मिळत आहे. आधुनिकतेप्रमाणे सध्या या लोककलांकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. त्याचे रूपही बदलत आहे. पारंपरिक पद्धतीत आधुनिकतेची भर पडली आहे, मात्र दशावताराप्रमाणे या नमन लोककलेला मानाचे स्थान प्राप्त झाले नाही. कोकणात नमनाच्या संवर्धनासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत. कोकणात या कलेला मोठा जनाधार आहे. नमन, जाखडी या लोकककलांची शासन दरबारी नोंद व्हावी, त्यांना राजाश्रय मिळावा अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. त्यासाठी नमन आणि जाखडी ह्या लोककलांना राज्य शासनाने मान्यता द्यावी अशी मागणी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्याकडे रत्नागिरी जिल्हा नमन मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे आणि हरिश्चंद्र बंडबे, श्रीकांत बोंबले ह्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे.